पांचगणी(रविकांत बेलोसे) : काटवली (तालुका जावली) येथे उभारण्यात आलेल्या बालवाडी इमारतीचे काम उद्घाटना आधीच खिळखिळे झाले असून भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या असून ठिकठिकाणी फरशी खचली आहे. यामुळे या ठेकेदाराच्या कामाबाबत चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की काटवली तालुका जावली येथे दोन वर्षांपूर्वी अंगणवाडी इमारतीसाठी शासकीय योजनेतून निधी उपलब्ध झाला. या कामाला ज्या मुख्य ठेकेदाराला काम दिले होते. त्या ठेकेदाराने आपल्या दुसऱ्या सब ठेकेदाराकडून हे काम करून घेतले आहे. अद्यापही या इमारतीचे उद्घाटन झाले नसून यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात बालवाडीच्या मुलांना बसवले जात आहे.
परंतु गेले चार महिन्यापूर्वी या नव्या कोऱ्या अंगणवाडीच्या इमारतीच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या असून ठिकठिकाणी फरशी खचून फुटली आहे. याबाबत या ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे देऊन हा प्रकार टाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे उद्घाटना आधीच गावाची जागा तसेच शासनाचा निधी याचा अपव्य झाल्याचा दिसून येत आहे.
शिक्षण विभागाने पाहणी करून ही इमारत भेगाळल्याने या ठिकाणी शाळा भरवू नये आशा सूचना केल्या आहेत.
त्यामुळे इमारत असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. संबंधित ठेकेदार व अधिकारी पाहणी करून गेले परंतु कसलीही कार्यवाही त्यांनी केली नाही. त्यामुळे अंगणवाडी मुलांचा प्रश्न गंभीर झाला आहे. निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदाराने केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून या इमारत दुरुस्तीचे काम त्या ठेकेदाराने सुधारितपने व तातडीने करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

चौकट: या इमारतीचे अद्यापही लोकार्पण केलेले नाही त्या आधीच या इमारतीचा बोऱ्या वाजल्याने ठेकेदाराच्या निकृष्ट कामाबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेने शाळेच्या मुलांचे मात्र नुकसान होणार आहे.
प्रतिक्रिया : माजी सरपंच हणमंत बेलोशे
संबंधित शाळेच्या ठेकेदाराने स्वतः काम करण्याऐवजी दुसऱ्याला काम दिले. त्याने ते काम रात्रीच्या वेळी कशाही पद्धतीने उरकले आहे. त्यामुळे बांधकामांचे नियम त्यांनी अक्षरशः धाब्यावर बसवले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. हे काम त्यांनी तातडीने करून द्यावे अशी आमची ग्रामस्थांची कळकळीची मागणी आहे.