मुंबई(रमेश औताडे) : नॉन स्टॉप पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी एजंट कडून लुटमार सुरू आहे. सरकारने जर खरोखरच आम्हा लाडक्या बहिणींना आर्थिक मदत करायची असेल तर वीजबिल, विमा योजना, मेडिकल, महागाई, शिक्षण या व इतर मूलभूत गरजा मध्ये सवलत द्यावी, फक्त घोषणा करून एजंटचे, झेरॉक्स दुकानदारांचे, ई महासेवा केंद्रवाल्यांचे खिसे भरण्याचे व भर पावसात घरची सर्व कामे सोडून रांगेत उभे करून आमचा वेळ वाया घालविण्याचे राजकारण करू नये. असे स्पट मत लाडक्या बहिणी लाडक्या भावाकडे करत आहेत.
योजनेची घोषणा केली तेव्हा सुरवातीला विविध प्रकारचे दाखले, पुरावे, बँक पासबुक, रेशनकार्ड, लाईटबिल, निवडणूक ओळखपत्र, रहिवाशी पुरावा, डोमासाईल, आधार कार्ड, योजना वयाची मर्यादा, अपुरा अवधी, फोटो, अशी सर्व कागदपत्रे सादर करण्याचे सांगितले. दोन दिवसांनी काही कागदपत्र कमी केले. मात्र वास्तवात चित्र वेगळे आहे.
अंगणवाडी महिला सविस्तर माहिती देत असताना, ई महासेवा केंद्रात गेले की वेगळी माहिती देण्यात येत होती. टिव्हीवर माहिती वेगळी दिली जाते. वृत्तपत्रात वेगळी माहिती असते, सोशल मीडियावर वेगळी तर नाक्यानाक्यावर वेगळी माहिती मिळत असल्याने अनेक महिला व योजनेसाठी धावपळ करणारे त्यांचे पती, भाऊ इतर नातेवाईक वैतागले आहेत.
काही ठिकाणी लग्न प्रमाणपत्र मागितले जाते तर काही ठिकाणी लग्न प्रमाणपत्र गॅझेट मध्ये नोंद असल्याचे पुरावे मागितले जात आहेत. त्यासाठी दोन ते तीन हजार ई महासेवा केंद्रातील एजंट मागत आहेत. पुरावे अर्जंट हवे असेल तर चार ते पाच हजार मागत आहेत. सरकार सांगते तक्रार करा. तक्रार कुठे आणि कशी करायची ? तक्रार नोंदणी करायला गेल्यावर तिथे लाच मागणार नाहीत याची खात्री सरकारने देणार आहे का ? असा सवाल करत संतप्त झालेली जनता तीव्र प्रतिक्रिया देत ” भिक नको पण कुत्र आवर ” असे बोलत आहेत.
अंगणवाडी, आशा सेविका, परिचारक या व इतर विभागातील महिला आंदोलन करत भर पावसात भावाकडे न्याय मागत आंदोलन करत आहेत. उद्या या १५०० रुपयांसाठी आम्हाला आंदोलन करावे लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुका निकाल पाहून या बहिणीसाठी भाऊ जागा झाला आहे. या आधी बहीण दिसली का नाही ? असा सवाल करत महिला संतप्त झाल्या आहेत.