प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार पत्रकार संजय डहाळे आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या ग्रंथपाल मिताली तरळ यांना पहिला
“अंबुद” पुरस्कार जाहीर झाला आहे.
पल्लवी फाऊंडेशन आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदापासून
“अंबुद” हा मन रिचार्ज करणारा उत्सव १३,१४,२७,२८ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आला असून या उत्सवात डहाळे आणि तरळ यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
संजय डहाळे हे गेली चार दशके पत्रकारिता करत असून कला,साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांची विविध विषयांवरील १३ पुस्तके आणि १० एकांकिका प्रकाशित झाल्या आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग यांचे पुरस्कार डहाळे यांनी पटकावले असून मुंबई उपनगरातील श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळाचे ते तब्बल १४ वर्षे कार्यवाह आणि विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत.
“अंबुद” पुरस्काराच्या दुसऱ्या मानकरी आहेत ज्येष्ठ ग्रंथपाल मिताली तरळ. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात त्या १९९२ मध्ये रुजू झाल्या आणि आजतागायत त्यांची ग्रंथसेवा सुरूच आहे ग्रंथसंग्रहालयात संदर्भ विभाग त्यांनी समर्थपणे सांभाळला असून त्यांच्या या ग्रंथ सेवेचा गौरव म्हणूनच त्यांना यंदाचा “अंबुद” पुरस्कार जाहीर करत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
१३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या आगळ्या पावसाळी उत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. या उत्सवात कवी अशोक बागवे, पत्रकार दिलीप ठाकूर, देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका रिया आळवेकर, कवी प्रसाद कुलकर्णी, वृषाली विनायक, सुधीर चित्ते हे सहभागी होणार असून खलिफा हा सांगीतिक अभिवाचन प्रयोगही सादर होणार आहे. कुर्ला पूर्व येथील प्रबोधन प्रयोग घरात सायंकाळी ५ वाजता हा उत्सव साजरा होईल, असे आयोजक शलाका कोरगावकर आणि रजनी राणे यांनी कळवले आहे.
जेष्ठ पत्रकार संजय डहाळे, मिताली तरळ यांना पहिला “अंबुद” पुरस्कार
RELATED ARTICLES