सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा वर्धापन दिन उत्सव या काळात छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये सुरु असून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ व छत्रपती शिवाजी कॉलेजचा भाषा विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील माझं कवितांचं गाव जकातवाडी हा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ उदघोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ या संकल्पनेवर आधारित काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज सुरु केले. फलटणचे मालोजीराजे निंबाळकर यांनी दिलेल्या फलटण निवास या इमारतीत हे सुरु झाले. त्यांनी १० एकर ८ गुंठे जमीन संस्थेला दिली. कमवा आणि शिका ही योजना ही महाविद्यालयाची विचारधारा आहे. प्रत्येक मुलाने श्रम करून आपले शिक्षण घ्यावे ,स्वावलंबी शिक्षण हा विचार कर्मवीरांचा मूल्यविचार होता. कर्मवीर भाऊराव पाटील हे स्वतःला रयत सेवक समजत असत. रयतेच्या शिक्षणासाठी व जागृतीसाठी त्यांनी आपले सारे आयुष्य समर्पित केले. सत्य, स्वातंत्र्य ,सचोटी ,अहिंसा,स्वावलंबन ,समता ,बंधुता ,न्याय या मुल्यांचा पुरस्कार त्यांनी केला. अज्ञानाचा अंधःकार दूर करण्यासाठी त्यांनी निर्भय होऊन सत्यशोधकी विचार समाजात रुजवून लोकांना डोळस बनविले. कर्मवीर अण्णांचे हे विचार आजच्या लोकशाहीत खूपच आवश्यक आहेत. भारतीय लोकशाही संवर्धनासाठी नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य खूपच महत्वाचे असते. आजच्या काळात व्यक्तिपूजा टाळून समाजाला संविधानिक मार्ग हाच हितकारी मार्ग आहे हे सांगण्यासाठी’ उदघोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ ही एक जन चळवळ व्हावी हे अभिप्रेत आहे. देशातला अज्ञानाचा काळोख दूर करण्यासाठी,देश एकोप्याने राहील यासाठी,धर्मांधता दूर करण्यासाठी ’व आम्ही भारतीय‘म्हणून एकात्म होण्यासाठी आपल्या प्रतिभाशाली शब्दांचे कार्य महत्वाचे आहे,म्हणूनच मनातले विचार व भावना व्यक्त करण्यासाठी हे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सदर कवी संमेलन शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील बॅरिस्टर पी.जी. पाटील सभागृहात संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या कवी संमेलनात प्रत्येक कवीला काव्य वाचन करण्याची संधी देण्यात येईल.मराठी,हिंदी,इंग्रजी वा संस्कृत ,अर्धमागधी भाषेत कविता सादर करता येईल. ज्या कविना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्या २ स्वलिखित कविता मराठी विभागातील प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे मोबाईल क्रमांक ९८२२८१ ६३५४ यांच्याकडे १९ जुलै २०२४ पर्यंत जमा कराव्यात.कविता वाचन करण्यासाठी कविता निवडीचे अंतिम अधिकार आयोजन समितीचे असतील.कवींच्या उपलब्धतेनुसार कविता किती सादर करावयाच्या त्याचे अधिकार समन्वयक यांना असतील. सदर कवी संमेलन खुल्या स्वरूपाचे असून वयाचे कोणतेही बंधन असणार नाही. सहभागी कविना कोणतेही मानधन अथवा प्रवासखर्च देण्यात येणार नाही मात्र कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कवींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. या कवी संमेलनात जिल्ह्यातील विविध कवीनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ.भरत जाधव, हिंदी विभाग प्रमुख बळवंत कॉलेज विटा,प्रा.डॉ,सविता मेनकुदळे ,प्रा.मनोज धावडे व माझं कवितांचं गाव जकातवाडी समुहाचे प्रमुख कवी प्रल्हाद पारटे,सुषमा आलेकरी यांनी केलेले आहे.