Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रदुर्दैवी! कोयना जलाशयात बुडून शाळकरी मुलींचा मृत्यू; पालकांच्या आक्रोशानं मन सुन्न

दुर्दैवी! कोयना जलाशयात बुडून शाळकरी मुलींचा मृत्यू; पालकांच्या आक्रोशानं मन सुन्न

तापोळा : महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातील कोयना धरणाच्या जलाशयात वाळणे गावात दुर्दैवी घटना घडली आहे. दोन अल्पवयीन मुलींचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एका मुलीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत तर चौथी मुलगी सुखरूप आहे. सोनाक्षी तानाजी कदम (१२), सोनाक्षी रामचंद्र सुतार (१२) अशी मृत झालेल्या शाळकरी मुलींची नावे आहेत. या मुलींना पोहता येत नसल्याने पाण्यात खेळण्यासाठी गेल्या असता पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची फिर्याद वाळणे गावातील आशासेविका शुभांगी सुनिल तांबे (४३) रा. वाळणे, ता. महाबळेश्वर जि. सातारा यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, रविवारी सकाळी शुभांगी तांबे यांच्या घरी तांबे यांची मुलगी हर्षदा सुनिल तांबे हिच्याबरोबर गावातील चार मैत्रिणी आर्या दीपक नलावडे (१२), सृष्टी सुनिल नलावडे (१३), सोनाक्षी रामचंद्र सुतार (१२) सर्व रा. वाळणे, ता. महाबळेश्वर तर सोनाक्षी तानाजी कदम (१२) या अभ्यास करण्यासाठी आल्या होत्या.

अभ्यास करीत असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुलींचा आवाज येत नसल्याने तांबे ह्या पाहण्यासाठी बाहेर आल्या. त्यावेळी घराजवळ असलेल्या कोयना धरणाच्या दिशेने मुलींचा आरडाओरडा सुरू असल्याचा आवाज ऐकू आला. त्यावेळी त्या आवाजाच्या दिशेने धरणाकडे गेल्या असता घरी अभ्यास करण्यासाठी आलेल्या चारही मुली पाण्यामध्ये बुडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी पळत जाऊन धरणाच्या पाण्यात उडी मारून आर्या नलावडे, सृष्टी नलावडे, सोनाक्षी सुतार या मुलींना बुडत असताना पाण्यातून बाहेर काढले. यावेळी परिसरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने धरणात मच्छीमारी करीत असलेल्या लोकांनी बोटीने येऊन सोनाक्षी कदमला पाण्यातून बाहेर काढले.

मात्र, या घटनेत सोनाक्षी कदम आणि सोनाक्षी सुतार यांचा मृत्यू झाला होता. सृष्टी सुनिल नलावडे हिच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा येथे उपचार करून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे दाखल केले आहे. आर्या नलावडे हिची तब्येत ठीक असल्याने तिला प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सोनाक्षी कदम आणि सोनाक्षी सुतार यांचे मृतदेह शवविच्छेदन करून रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची फिर्याद वाळणे गावातील आशासेविका शुभांगी सुनिल तांबे (४३) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलीस तपास अधिक करत आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments