मुंबई : आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या बारबाडोस येथील अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत इतिहास रचला. टीम इंडियाच्या विजयाचे शिलेदार असलेल्या भारतीय संघातील 4 मुंबईकर खेळाडूंचा आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात सत्कार करण्यात आला. यावेळी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात सूर्यकुमार यादवाच्या कॅचचं वर्णन करताना, २ वर्षांपूर्वी केलेल्या बंडाची आठवणही सांगितली. सूर्यकुमार यादवचा कॅच जसं विसरता येणार नाही, तसेच २ वर्षांपूर्वी आम्ही काढलेली विकेटही विसरता येणार नाही,असे म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. दरम्यान, टीम इंडियाला ११ कोटी रुपयांचे बक्षीसही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण करताना सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज की जय.. भारत माता की जय… असा जयघोष केला. विश्वविजयी भारतीय संघाचं अभिनंदन करुन संघाला शुभेच्छा दिल्या. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे यांचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनापासून स्वागत करतो, असे शिंदे यांनी म्हटले.
१७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आपण वर्ल्डकप जिंकला. त्यातच, पाकिस्तानला हरवलं तेव्हाच अर्धा वर्ल्डकप आपण जिंकला होता, असे एकनाथ शिंदेंनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कटकडाट झाला. काल आपण जो जल्लोष पाहिला की, अरबी समुद्राच्या बाजुला मुंबईकरांचा महासागर उसळला होता. ते पाहून आम्हालाही धडकी भरली होती, कारण एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील, असे कोणालाही वाटलं नव्हतं. पण, गर्दी पाहता आम्ही पोलिस आयुक्तांना फोन करुन वाहतुकीचं नियोजन आणि सर्वकाही सुरळीत होण्यासाठी सूचना केल्या. रोहित आणि सूर्यकुमार हेही मला म्हणाले, एवढी मोठी गर्दी कशी हाताळली. तेव्हा मी म्हणालो, हे आमचे मुंबईचं पोलिस आहे. म्हणून, मी मुंबईच्या पोलिसांचं अभिनंदन करतो. भारत हा क्रिकेटचा विश्वगुरु आहे. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे, क्रिकेटप्रेमी वारकरी काल मुंबईकडे निघाले होते, असं वर्णन मुख्यमंत्र्यांनी कालच्या गर्दीचं केले.
मुंबईकर खेळाडूंचा अभिमान
भारतीय संघात ४ मुंबईकर खेळाडू होते, याचा विशेष अभिमान आहे. तर, संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हेही आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत, हेही अभिमानाची बाब आहे. मी मॅच बघतो म्हटलं तर कोणालाही विश्वास बसणार नाही. पण, मी वर्ल्डकपची फायनल मॅच पाहत होतो. सुनिल वाडेकरांचं एक गाणं आज आठवतंय. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. कारण, तो कॅच हुकला असता तर काय झालं असतं, असे म्हणत विजयाचा आनंद साजरा करू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग
अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आहे, एकही मारा लेकीन सॉलिड मारा. सूर्यकुमारने एकच कॅच घेतला, पण सॉलिड घेतला. सूर्याचा तो कॅच आठवला की, डेव्हिड मिलर रात्री झोपेत दचकून उठत असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरेंना टोला
सूर्यकुमारजी तुमचा कॅच जसं कोणी विसरणार नाही, तसंच आमच्या ५० जणांच्या टीमने २ वर्षांपूर्वी काढलेली विकेटही कुणी विसरु शकणार नाही. गेल्या २ वर्षांपासून आम्हीही बॅटींग करत आहोत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसेच, रोहित शर्मासह टीम इंडियाचे अभिनंदन करत राज्य सरकारच्यावतीने भारतीय संघाला ११ कोटी रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येत असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.