Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भमहायुतीचा पुढील मुख्यमंत्री कोण ? पंकजा मुंडे यांचे आश्चर्यकारक उत्तर

महायुतीचा पुढील मुख्यमंत्री कोण ? पंकजा मुंडे यांचे आश्चर्यकारक उत्तर

मुंबई : मागील २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव, नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पराभव झाल्यामुळे भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनावर चर्चा घडू लागल्या. तर, भाजपनेही  लोकसभेतील पराभवाची कारणमिमांसा करताना मराठवाड्यात पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना संधी देत भाजपची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. भाजपने विधानपरिषदेसाठी ५ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात पंकजा मुंडेंसह  तीन ओबीसी नेत्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, मुंडेंसमर्थकांची प्रतिक्षा संपली असून कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे अनेक कार्यकर्ते मुंबईकडेही रवाना झाले होते. मात्र, पंकजा मुंडे नागपूर दौऱ्यावर असल्याने ते परत फिरले आहेत. आता, नागपूरमधून पंकजा मुंडेंनी पत्रकारांशी बोलताना महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या  चेहऱ्यावर भाष्य केलं आहे.   

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळे सांत्वन भेटीसाठी पंकजा मुंडे त्यांच्या घरी गेल्या होत्या. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, विधानपरिषदेच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडेंनी आश्चर्यकारक उत्तर दिलं आहे. 

मागील १५ वर्षांपासून मी राजकारणात आहे, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे सांगायला माझी पात्रता नाही, असं आश्चर्यकारक उत्तर पंकजा यांनी दिलं आहे. कधीकाळी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं पंकजा यांनी म्हटलं होतं. त्यानंतरच, त्यांच्या नेतृत्त्वाला साईडलाईन करण्यास सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होत असते. त्यामुळे, विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिलेलं हे उत्तर भुवया उंचावणारं आहे. तर, मंत्रीपदाबाबत विचारले असता, एखाद्या गोष्टीनंतर काहीतरी असते, चर्चा होतेच. प्रत्यक्षात ते उतरेल तेव्हा कळेल, असे म्हणत मंत्रीपदाच्या चर्चेवरही त्यांनी स्पष्टपणे बोलणे टाळल्याचं दिसून आलं. दरम्यान, पंकजा मुंडेंनी विधानपरिषदेसाठी उमेदवारीचा अर्ज भरला, त्याआधी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर, वरळीत माध्यमांशी संवाद साधताना त्या भावूक झाल्याचे दिसून आले होते.  

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments