प्रतिनिधी : हिंगोली येथील अग्रसेन चौकात संत नामदेव महाराजांच्या पालखीचे गुरुवारी दुपारी उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर रामलिला मैदानावर पहिले रिंगण अभूतपूर्व उत्साह अन डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले आहे. यावेळी सुमारे १० अश्वांच्या माध्यमातून रिंगण पार पडले. यावेळी हजारो वारकरी या रिंगण सोहळ्याचा आनंद घेताना बघायला मिळाले.
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा आषाढी एकादशी निमित्त बुधवारी (ता. 26) पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. संत नामदेव संस्थान पासून पालखी सोहळा निघाल्यानंतर नगर प्रदक्षिणा घेण्यात आली. त्यानंतर पालखी नर्सी येथेच मुक्कामी होती. त्यानंतर आज सकाळी पालखी नर्सी येथून हिंगोलीकडे येत असतांना रस्त्यात ठिकठिकाणी पालखी सोहळयाचे स्वागत करण्यात आले. सवड येथे वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, दुपारी पालखी सोहळा हिंगोलीच्या अग्रसेन चैाकात दाखल झाल्यानंतर पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.