मुंबई : पावसाळा सुरू झाल्याने रस्ते प्रकल्पातील भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते याचा मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य लोक अडचणींचा सामना करत असताना राज्य सरकार आणि बीएमसी मात्र त्यांच्या कंत्राटदार मित्रांना वाचवण्यात व्यस्त आहेत. मुंबईकरांना भेडसावत असलेल्या निकृष्ट रस्त्यांची समस्या, फुटपाथवरील अतिक्रमणे व मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळेल, याकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
मुंबईतील समस्यांसदर्भात खासदार वर्षा गायकवाड यांनी महापालिका उपायुक्त (परिमंडळ – ५) देविदास क्षीरसागर आणि सहाय्यक महापालिका आयुक्त धनाजी हेर्लेकर यांची बैठक घेऊन प्रशासनाच्या उदासीन आणि भ्रष्टाचारी कारभाराविरुद्ध आवाज उठलला. गायकवाड म्हणाल्या की, चांदिवली आणि पवई येथील नागरिकांनी आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वारंवार तक्रारी करून देखील प्रशासनाने रस्त्यांच्या समस्यांकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली. पवईतील डीपी रोड क्रमांक ९ वर सुरू असलेल्या निकृष्ट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम आणि नारी सेवासदन रोड, विद्यानगरी रोड, लोकमान्य टिळक रोड तसेच मतदार संघातील पाईपलाईन रोडवरील खराब रस्त्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले, या तक्रारींवर तातडीने लक्ष देऊन त्यांचे निराकरण केले जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
अशोक नगर, महात्मा फुले नगर, लोकमान्य टिळक नगर, जरीमरी, भीमनगर यांसह इतर भागातील रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त केली असता या भागांना पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासनही बीएमसी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.याशिवाय रस्त्यावरील कचरा वेळेवर गोळा न होत असल्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या तसेच फूटपाथवरील अतिक्रमण हटवणे व फूटपाथ पादचाऱ्यांसाठी अधिक अनुकूल बनवण्यासंदर्भातही चर्चा झाली. जोपर्यंत प्रशासन या सर्व समस्यांवर ठोस उपाययोजना आखून त्या अंमलात आणत नाही, तोपर्यंत पाठपुरावा करत राहू, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.