प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला ऐंशीवा वाढदिवस साजरा केला. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांना सर्वत्र विजयदादा म्हणून प्रेमाने संबोधण्यात येते. दैनिक ‘सामना’ साठी मंत्रालय आणि विधिमंडळ या ठिकाणी राजकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतांना असंख्य नेत्यांप्रमाणेच विजयदादांशीही ओळख झाली. विजयदादा हे बरीच वर्षे मंत्री म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे बांधकाम विभाग हा त्यांच्या आवडीचा. सुमारे तीस वर्षांपूर्वी आमच्या मानस भगिनी सौ. शर्मिला शरद पाठक आणि श्री. शरद गजानन पाठक, कन्या संगीता यांच्या समवेत कोल्हापूर येथे गेलो होतो. अधिस्वीकृती पत्रिका धारक पत्रकार असल्याने मला राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिथीगृहात वास्तव्य करण्याची सुविधा मिळते. त्याप्रमाणे त्या कोल्हापूर दौऱ्यावर असतांना तेथील शासकीय अतिथीगृहात थांबलो होतो. योगायोगाने विजयदादा हेही त्यांच्या पत्नी सौ. नंदिनीदेवी यांच्या समवेत तेथे आले होते. शरदराव आणि शर्मिला ताई, प्रकाश पाठक हे जवळच्या गावी त्यांच्या कौटुंबिक कामासाठी गेले होते. मी सकाळी लवकर शुचिर्भूत होऊन अतिथीगृहाच्या आवारात उभा होतो. इतक्यात विजयदादा आणि सौ. नंदिनीदेवी बाहेर पडले. मला पाहताच विजयदादा म्हणाले, “अहो त्रिवेदी, काय करताय ? चला आमच्या बरोबर.” मी त्यांच्या बरोबर जाण्यासाठी पटकन तयार झालो. विजयदादांबरोबर आमचा लवाजमा थेट गगनबावडा येथे पोहोचला. गगनगडाच्या पायथ्याशी शासकीय विश्रामगृहात चहा पाणी घ्यायला थांबलो. तासाभरात आमचा लवाजमा गडावर पोहोचला. वहिनी साहेबांसाठी गडावर जाण्यासाठी डोली तैनात होती परंतु वहिनी साहेबांनी डोलीत बसून जाण्यासाठी नकार दिला. विजयदादा, वहिनी साहेब आणि मी गड चढून गेलो. गगनबावडा येथे परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या मठात पोहोचलो. थोडाफार संवाद झाला. महाराजांचे आशीर्वाद घेतले. महाराज झोपाळ्यावर बसलेले होते आणि आम्ही खाली सतरंजीवर बसून महाराजांसमोर झुणका भाकरीचा प्रसाद ग्रहण केला. पुनश्च आशीर्वाद घेऊन कोल्हापूर येथे परतलो. विजयदादांमुळे मला संत गगनगिरी महाराज यांच्या सहवासाचा लाभ झाला. श्रीपाद गणपतराव पाटणकर हे गगनगिरी महाराज यांचे नांव. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त विजयसिंह पाटणकर हेही गगनगिरी महाराज यांचे बंधू. अंबरनाथ येथे १९६९ पासून प्राचीन शिवमंदिर परिसरात भाऊसाहेब परांजपे चाळीत आम्ही वास्तव्यास असतांना ती चाळ मग भाऊसाहेब परांजपे यांचे सहकारी शांताराम वामन नाईक यांनी घेतली. या चाळीतील एका खोलीत आम्ही रहात होतो आणि एका खोलीत मनोरमा मुद्रणाचे कामकाज चालायचे. या दोन दोन खोल्या होत्या. मग तेथील दोन खोल्या आम्ही भाऊसाहेब कृष्णाजी विश्वनाथ केतकर यांना जागा कमी पडत असल्याने त्यांना दिल्या. भाऊसाहेब केतकर हे सुद्धा अध्यात्ममार्गी असल्याने आणि त्यांच्याकडे दत्तभक्तांची गर्दी वाढू लागल्याने ते एका खोलीतून दोन खोल्यांत आले. एका खोलीत दत्तमंदिर होते. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष त्र्यंबक शिवराम उर्फ बाळासाहेबभारदे, माजी महसूलमंत्री शांताराम भाऊ घोलप, माजी राज्यमंत्री नकुल पाटील, माजी मंत्री साबीरभाई शेख अशी सर्वच क्षेत्रातील असंख्य मंडळी येत असत. परमपूज्य गगनगिरी महाराज हे सुद्धा आले. नदीमध्ये तपश्चर्या करतांना त्यांचे पाय माशांनी खाल्ल्यामुळे महाराजांना त्यांचे सेवक पाठीवर घेऊन फिरत असत. असेच एकदा परमपूज्य गगनगिरी महाराज आमच्याकडे भाऊसाहेब केतकर यांना भेटायला आले होते. ‘ज्ञानीसे ज्ञानी करे दो दो बात’, असा प्रसंग होता. खोपोली येथे महाराजांच्या आश्रमात सुद्धा सुप्रसिद्ध वकील आणि मानस भगिनी शशीकलाताई रेवणकर यांच्या समवेत भेटीचा आणि आशीर्वाद घेण्याचा योग आला. महाराजांच्या महानिर्वाणानंतरही खोपोली येथे भेट दिली होती. विजयसिंह मोहिते पाटील अर्थात विजयदादांमुळे गगनबावडा येथे संत सहवास लाभला हे कृतज्ञतापूर्वक नमूद करण्यासाठी हा लेखन प्रपंच. या निमित्ताने विजयदादा यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो या मनःपूर्वक शुभेच्छा !
-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१ (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत