प्रतिनिधी : अंतरवाली सराटीत उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणचा आज 5 वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. राज्य सरकारने सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी त्यांच्या उपोषणाचा लढा सुरू आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर मनोज जरांगे यांनी 8 जूनपासून उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या उपोषणाला आमदार, खासदारांचा पाठिंबा मिळत असून अनेकजण त्यांच्या भेटीसाठी येत आहेत. त्यातच, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मध्यरात्री 2.30 वाजता त्यांची भेट घेऊन उपचार घेण्याची विनंती त्यांना केली होती. त्यानंतर, मध्यरात्री जरांगे यांनी सलाईन घेतले. तर, आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.
मी शिंदे साहेबांना आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो की, मी हे उपोषण असंच स्थगित करू शकत नाही. कारण, काही गोष्टी डिटेल्समध्ये माहिती झाल्या पाहिजेत. सगे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही लगेच करणार आहात का, किती दिवस लागणार आहेत?, केसेस लगेच मागे घेणार की किती दिवसात करणार?, हैदराबादचं गॅझेटला किती दिवस लागेल, हे मला आणि माझ्या समाजाला डिटेल्स पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.