Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात आरोग्य केंद्रात मुदत संपलेल्या औषधाच्या वितरणाबाबत आंदोलन

साताऱ्यात आरोग्य केंद्रात मुदत संपलेल्या औषधाच्या वितरणाबाबत आंदोलन

सातारा (अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभाग सध्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहे. परंतु, विलासपूर येथील आरोग्य केंद्रांमध्ये एका रुग्णाला मुदत संपलेली औषध दिल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी. अशी मागणी आझाद समाज पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष आतिश कांबळे यांनी केले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश येथील खा. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं असून सातारा जिल्ह्यात आझाद समाज पार्टीच्या प्रवेशाने कार्यकर्त्यांना आणखीन एक विचारपीठ उपलब्ध झाले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी जनजागृती केली जाते. महिला, जेष्ठ नागरिक व लहान बाळ यांच्यासाठी विविध स्तरावर आरोग्य शिबिर घेतली जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात औषधाचा साठा पुरवला जातो. त्याची वेळोवेळी तपासणी केली जाते. परंतु, विलासपूर आरोग्य केंद्रामध्ये २४ मे २०२४ रोजी महिला रुग्ण मेगा आतिश कांबळे यांना प्राथमिक आरोग्य केंद्र विलासपूर या ठिकाणी तपासणी केल्यानंतर त्यांना उपचारासाठी औषध दिले . त्या औषधाची मुदत संपली होती. ही बाब त्यांनी आतिश कांबळे यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे इतरांच्या आरोग्याबाबत मुदत संपलेली औषध वितरित होऊ नये. याची खबरदारी म्हणून त्यांनी आंदोलन केलेले आहे.
या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असून दिनांक ५ जून पासून ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहेत . आठवडा झाला तरी ही अद्यापही क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय पथक वगळता कुणीही या आंदोलनाचे दखल घेतलेली नाही .एवढा निर्डावलेलापणा कधीही आरोग्य विभागात दिसून येत नव्हता.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे सातारा जिल्हा परिषद किंवा नगरपंचायत व नगरपरिषद अशा ठिकाणी प्रशासकीय कामकाजाच्या नावाने कामात काही जण कुचराई करीत आहेत. याचा हा धडधडीत पुरावा असल्याचेही आझाद समाज पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष श्री कांबळे यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत पावसाळी अधिवेशनात विधान परिषद व विधान भवनमध्ये सातारा जिल्ह्यासह इतर जागृत आमदारांनी आवाज उठवावा. यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने प्रयत्न केला जात आहे. अशी माहिती देण्यात आली.
तातडीने कारवाई होणे अपेक्षित असताना आरोग्य विभाग आजारी पडल्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे आहे सध्या आरोग्य विभागात बदली सत्र सुरू झाल्यामुळे रुग्णांची काळजी घेण्यापेक्षा काही वैद्यकीय अधिकारी हे आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी म्हणून प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. याचीही निपक्षपातीपणाने आरोग्य सचिवांनी चौकशी करावी अशी मागणी पुढे आलेली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र कार्यरत आहेत. पूर्वी आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी केलेल्या उपाय योजनेबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी माहिती दिली जात होती. आता तशा पद्धतीने माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे आरोप होऊ लागलेले आहेत. यामध्येही तथ्य आढळून आलेले आहे. याबाबत सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी लक्ष घालावे. अशी विनंती जेष्ठ नागरिक संघाने केलेली आहे.


RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments