पवई येथील भीमनगर झोपडपट्टीवरील कारवाईची न्यायालयीन चौकशी करा – खासदार वर्षा गायकवाड.
मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या पथकाने ६ जून २०२४ रोजीच्या रात्री पवई येथील भीमनगर झोपडपट्टीवर कारवाई करून ८०० कुटुंबांना रस्त्यावर आणले आहे. १ जूनला नोटीस देऊन पोलिसांच्या बंदोबस्तात झोपडपट्टी तोडण्यात आली. १ जून ते ३० सप्टेंबर या काळात झोपडपट्ट्यांवर कारवाई करू नये हा शासकीय नियम असतानाही ही कारवाई का करण्यात आली. सरकार कोणासाठी काम करत आहे, असे प्रश्न विचारत या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांनी पवईतील भीमनगरला भेट देऊन बीएमसीने केलेल्या कारवाईची पाहणी केली व स्थानिकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, महानगरपालिकेने केलेली कारवाई ही नियमबाह्य आहे. एक तर पावसाळ्यात अशी कारवाई करायची काही गरज नव्हती. करवाई करण्यापूर्वी या लोकांना काही वेळ द्यायला हवा होता पण तोही दिला देला नाही, या गरिब लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा होता तोही केला नाही. बीएमसी या कुटुंबांना बेघर केले आहे, त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यांना पाण्याची सोय नाही, शौचालयाची सोय नाही. रात्री मुंबईत मोठा पाऊस झाला, त्यामुळे लहान मुले आजारी पडली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या मुलांची वैद्यकीय तपासणी करून योग्य ते उपचार करावेत. आता हे लोक उघड्यावर आले आहेत, त्यांची तात्पुरती निवाऱ्याची सोय करावी, पाणी व जेवण व शौचालयाची सोय करावी अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली आहे.