Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भप्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला मतदारांनी नाकारले

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला मतदारांनी नाकारले

मुंबई (खास प्रतिनिधी) – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शानदार प्रदर्शन करणारी वंचित बहुजन आघाडी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र बॅकफूटवर गेली आहे. या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ३४ उमेदवार उभे केले होते. पैकी स्वतः प्रकाश आंबेडकर वगळता इतर ३३ उमेदवारांचे अक्षरशः डिपॉजिट जप्त झालेले आहे. आंबेडकरांना मतदान म्हणजे भाजपला फायदा, ही बाब लोकांच्या लक्षात आल्याने मतदारांनी वंचित आघाडीकडे पाठ फिरवली असल्याचा सूर राज्यात उमटत आहे. शिवाय, चारशे पारचा नारा देऊन, भाजप नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली होती. त्यामुळे दलित, ओबीसी हा घटक बिथरला होता. आंबेडकरांना मतदान केले असते, तर महाआघाडीच्या जागा पडल्या असत्या, म्हणून मतदारांनी वंचित आघाडीला मतदान टाळले, असाही राजकीय सूर उमटत आहे. तर, आंबेडकरांनी या पराजयाबद्दल आत्मचिंतन करण्याची गरजही व्यक्त होत आहे. अर्थात, आंबेडकर हे सत्तेसाठी निवडणुका लढवत नाहीत, त्यांना चळवळ जीवंत ठेवायची असते. त्यासाठी ते दीर्घकालीन विचार करत असतात. तरीदेखील त्यांची भूमिका मतदारांनी नाकारल्याने त्यांनी याबाबत पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखीत होत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षासोबत प्रकाश आंबेडकर यांनी युती केली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू एकत्र आल्याबद्दल महाराष्ट्राला आनंदही झाला होता. परंतु, जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली, तसतशी आंबेडकर व वंचित आघाडीच्या नेत्यांची अटी व शर्तीची भाषा बदलू लागली. अखेरशेवटी आंबेडकर यांनी शिवसेना व महाआघाडीसोबतची युती तोडली व स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकार व भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल मराठी माणसांच्या मनात खदखद होती. त्यातच भाजपच्या नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने चर्चेतील चेहरे देऊन व सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करूनही मतदारांनी वंचित आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे टाळले. वंचित आघाडीला मतदान केले तर महाआघाडीचे उमेदवार पडतील व त्याचा फायदा भाजपला होईल, अशी भीती मतदारांना होती. त्यामुळे राज्यात ३४ पैकी ३३ ठिकाणी वंचित आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झालेले आहे. स्वतः प्रकाश आंबेडकर हेदेखील अकोल्यातून मोठ्या फरकाने पराभूत झाले, तेथे ते तिसर्‍या क्रमांकावर फेकल्या गेल्याने अकोल्याच्या बालेकिल्ल्यात आंबेडकर चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments