Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकोल्हापूरप्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता नको…एसटीमध्ये 'युपीआय' प्रणालीला भरघोस प्रतिसाद…

प्रवासात सुट्ट्या पैशांची चिंता नको…एसटीमध्ये ‘युपीआय’ प्रणालीला भरघोस प्रतिसाद…


प्रतिनिधी :   एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता नको. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवाशांना ‘युपीआय ‘ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासाठी सर्व वाहकांसाठी ॲण्ड्राईड तिकीट इश्यू मशिन्स (ETIM) नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकिट काढता येते. जानेवारी २०२४ ते मे २०२४ अखेर १४ लाख ३२ हजार तिकीटांची विक्री झाली असून यातून गेल्या ५ महिन्यात ३५ कोटी ८७ लाख १५ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
निश्चलनीकरणाच्या (कॅशलेस) दृष्टीकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे या सारख्या युपीआय पेमेंट ची सुविधा उपलब्ध करून दिली. वाहकाच्या ॲड्राईड तिकीट मशीन वर असलेल्या क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे. अर्थात, प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत तसेच, सुट्या पैशासाठी वाहकासोबत होणारा वाद असे प्रश्न कायमचे मिटले आहेत. या सहज आणि सुलभ तिकीट प्रणालीला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला असून जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन केवळ ३ हजार ५०० तिकीटे युपीआयव्दारे काढली जात होती. त्यामध्ये मे, २०२४ मध्ये पाचपट वाढ होऊन प्रतिदिन २० हजार ४०० तिकीटे सरासरी काढली जात आहेत. अर्थात, युपीआय पेमेंटव्दारे महामंडळाच्या खात्यावर पैसे जमा होण्याचे प्रमाण देखील वाढले असून ते जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन १० लाख रुपये होते, आता मे, २०२४ मध्ये ४५ लाख रूपये प्रतिदिन झाले आहे.

प्रवाशांनी प्रवासादरम्यान नेहमी वाहकाकडे युपीआय तिकीटाची मागणी करावी जेणेकरून सुटया पैशावरून होणारे वादविवाद टाळले जातील. सहाजिकच आपला प्रवास सुखकर व समाधानकारक होईल. युपीआय पेमेंटव्दारे क्युआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

-:युपीआय पेमेंटव्दारे प्राप्त उत्पन्न विवरण:-
अ.क्र महिना तिकीट संख्या उत्पन्न (लाखात)
०१. जानेवारी-२०२४ १०९४९६ ३,१२,८७,२७७/-
०२. फेब्रुवारी-२०२४ १३३१५७ ४,१०,७०,९४१/-
०३. मार्च-२०२४ २०५९६१ ५,८६,५०,७८७/-
०४. एप्रिल-२०२४ ३५०७३६ ८,७५,२३,९१०/-
०५. मे-२०२४ ६३२६९० १४,०१,८२,७०७/-
एकूण १४३२०४० ३५,८७,१५,६२२/- वरील माहिती एस टी चे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments