प्रतिनिधी : या देशात अहंकाराला थारा नाही. लोकशाही आणि राज्यघटना संपवण्याचा भाजपचा प्रयत्न इथल्या जनतेने हाणून पाडला आहे. पण अजून लढाई संपलेली नाही. हेच चित्र यंदा पुन्हा पाहायला मिळणार आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभेविषयी सूतोवाच केले आहे.
एक्स पोस्टवर आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या अहंकारी वृत्तीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, संसदेच्या प्रांगणातले महापुरुषांचे पुतळे हटवण्यात आले आहेत. हे अतिशय वाईट आहे. भाजपच्या संविधान बदलण्याचे आणि लोकशाही संपवण्याचे मनसुबे देशातील मतदारांनी उधळून लावले आहेत. मतदारांनी भाजपच्या हुकूमशाही वृत्तीला, संविधानाला बदलून आपल्या पक्षाचे नियम लागू करण्याला, अहंकाराला नकार दिला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातही भाजपने ज्या प्रकारे राज्याची लूट केली आणि राज्याचं आर्थिक बळ कमी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच मतदारांनी भाजपला त्याची जागा दाखवून दिली. आज देशाच्या मतदार, कार्यकर्त्यांच्या मदतीने आपण आपलं संविधान, लोकशाही वाचवण्यात यशस्वी ठरलो आहोत. पण, ही लढाई अजून संपलेली नाही. यंदा पुन्हा हेच चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि संपूर्ण विजय मिळवल्याशिवाय आपण अजिबात थांबायचं नाही, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.