प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन आजपासून पुन्हा सुरू झाले. गेल्या अडीच महिन्यांपासून हे पदस्पर्श दर्शन बंद होते. आज पहाटे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नित्य पूजा संपन्न झाली. त्यानंतर भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले.
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धन आणि सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर १५ मार्चपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते. आता हे काम पूर्ण झाल्याने आषाढी वारीच्या एक महिनाआधी मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. या डागडुजीत मंदिराला ७०० वर्षापूर्वीचे मूळ रूप देण्यात आले आहे. आज पहिल्यांदाच मंदिराचे नवे रुप सर्वांना पाहायला मिळाले. यानिमित्त मंदिर समितीने विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट देखील केली. तब्बल अडीच महिन्यांनंतर विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली.
विठूरायाची पूजा संपन्न झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. “यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. तर काही भागात दुष्काळ देखील पडला आहे. त्यामुळे यंदा पाऊस होऊन शेतकरी सुखी व्हावा, अशी प्रार्थना मी विठुराया चरणी केली. राज्य सरकारने विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धन कामासाठी ७५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामधून हे सुंदर काम झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. गेल्यावेळी राज्यात विरोधकांना ७ जागा मिळाल्या होत्या. त्या आता वाढून ८ होतील, तर महायुतीला ३८ ते ४१ जागा मिळतील”, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.