Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रवाढदिवस विशेष लेख         समाज कार्यकर्ते - पत्रकार सत्यवान तेटांबे ! …….

वाढदिवस विशेष लेख         समाज कार्यकर्ते – पत्रकार सत्यवान तेटांबे ! …….

सत्यवान तेटांबे हे नाव सर्वदूर पसरलेले आहे ते ‘सिने नाट्य साहित्यकोश’ या डायरीमुळे. या डायरीत सिने नाट्य क्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्री, साहित्यिक यांचे दूरध्वनी , मोबाईल क्रमांक, पत्ते, ईमेल अड्रेस आहेत. अनेक चाहत्यांना वाटते की आपण अभिताभ बच्चन यासह अनेक अभिनेते,अभिनेत्रीं बरोबर बोलावे ,त्यांना पत्र पाठवावे.. मेल करावा… त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे. हे 25/30 वर्षापूर्वी शक्य नव्हते. पण हजारो चाहत्यांना सत्यवान तेटांबे यांच्या डायरीमुळे ते शक्य झाले होते.आता तर डिजीटल युग आहे.चाहते आपल्या आवडीच्या अभिनेत्याशी चॅटींगही करीत असतील.मेलही पाठवत असतील.पण तेंव्हा दूरध्वनी हाच आधार होता.तो दूरध्वनीही मिळायचा तो तेटांबे यांच्या या डायरीतून.1979 पासून त्यांची ही डायरी प्रसिद्ध होण्यास सुरवात होऊन आजतागायत दरवर्षी ती प्रसिद्ध होत आहे.तेटांबे हे मुळचे एक कामगार. परंतु धडपड्या स्वभावामुळे कामगाराचे ते पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते बनले.. ते मुंबईत कांदिवलीला महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीत साधे कामगार होते.पेपरला लोक समस्यांच्या बातम्या याव्यात म्हणून ते दैनिकांना लोकांची पत्रके पाठवू लागले. लोकांंच्या बातम्यासाठी फोन करू लागले.पत्रके व्यवस्थित लिहिली जात नाहीत हे पाहून त्यांनीच लेखनी हाती घेतली. त्यातून ते पत्रकार म्हणून घडले.त्यांनी विश्वनाथराव वाबळेे यांच्या दैनिक शिवनेर मध्ये वार्ताहर म्हणून काम केलेले आहे.याच दैनिकात त्यांनी नाट्य समीक्षा हे सदरही काही काळ चालविले.या वृत्तपत्रात तेटांबे यांनी दिलेल्या एका बातमीमुळे त्यावेळेचे राज्याचे शिक्षण मंत्री अनंंत नामजोशी यांना मंत्रीमंडळातून डच्चू मिळाला होता. याप्रकरणात तेटांबेंवर पैसे खाल्ल्याचाही आरोप झाला. पण मी पैसे खाल्ल्याचे सिध्द झाले तर मी पत्रकारिता सोडेल, असे त्यांनी संपादकांना तेंव्हा निक्षून सांंगितले होते. शेवटी याप्रकरणात तेटांबे हे स्वच्छ असल्याची क्लिन चीट संपादकांनीच दिली होती.अशा तेटांबे यांनी मराठा, नवशक्ती, नवाकाळ, सांज मराठा,संध्याकाळ, चित्रानंद, रसरंग या दैनिक – साप्ताहिकातही त्यांनी पत्रकारिता केली.आपल्या पत्रकारीतेच्या कारकीर्दीत त्यांंनी सच्चाईस प्राधान्य दिले. यामुळेच त्यांचे अनेकांशी त्यांचे संबंध बिघडले.परंतु तेटांबे यांची बाजू न्याय आहे,असे जेंव्हा सहकारी पत्रकारांना उमजत असे तेच त्यांचे मित्र बनत असे.. एक कामगार.. सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, दिवाळी अंकांंचे संपादक. पुस्तके प्रकाशित करणारे प्रकाशक आणि सिने नाट्य साहित्यकोश याचे निर्माते असा प्रवास करणारे सत्यवान तेटांबे यांचा येत्या 1 जूून 2024 रोजी 82 वा वाढदिवस आहे. ** साधारणपणे 1960 पासून म्हणजे जवळजवळ 60 ते 65 वर्ष सत्यवान तेटांबे हे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. रंगभूमी चित्रपट डायरी म्हणजेच वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांनी ज्याचे नामांतर सीने नाट्य साहित्यकोश असे केले. त्याचे संपादक म्हणजेच सत्यवान तेटांबे. अनेक मान्यवरांनी तसेच प्रसिद्धी माध्यमांनी हा मराठी भाषेतून प्रसिद्ध होणारा एकमेव संदर्भ ग्रंथ आहे, असा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून या संदर्भ ग्रंथाचा उल्लेख केला आहे.पु .ल.देशपांडे, कवी कुसुमाग्रज, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विद्याधरजी गोखले, डॉ.श्रीराम लागू,प्रभाकर पणशीकर, माजी संरक्षणमंत्री यशवंतरावजी चव्हाण,माजी मुख्यमंत्री शरदराव पवार, माजी रेल्वेमंत्री मधु दंडवते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सत्यवान तेटांबे यांचा गौरव केला आहे. तेटांबे यांनी त्यांच्या साक्षीदार प्रकाशन तर्फे जवळपास शंभरेक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. गेल्या 40-50 वर्षापासून ते चौफेर साक्षीदार, साहित्य रंजन व सिने नाट्य दिवाळी अंक असे तीन दिवाळी अंक व एक विशेषांक प्रसिद्ध करीत आहेत. शिवाजी महाराजांवर शिवगाथा विशेषांक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेषांक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विशेषांक, भाजप नेते गोपीनाथजी मुंडे विशेषांक, धर्मवीर आनंद दिघे विशेषांक, स्वातंत्र्यवीर सावरकर विशेषांक असे अनेक विशेषांक त्यांनी आतापर्यंत प्रसिद्ध केलेले आहेत. या त्यांच्या कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तेटांबे यांचे कौतुक केलेले आहे.13 ऑगस्ट 2024 रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची जयंती आहे. त्यानिमित्त तेटांबे हे आचार्य अत्रे जयंती विशेषांक चे प्रकाशन मुंबई मराठी पत्रकार संघात करणार असून या विशेषांकासाठी साहित्य पाठवावे असे आवाहन त्यांनी अत्रे यांच्या चाहत्यांना केले आहे.*** बोरवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यगृह हे तेेटांबे यांच्या अथक प्रयत्नाचे फळ आहे. मुंबईचे माजी महापौर , माजी मंत्री दिवाकर रावते यांनी बेळगाव येथे झालेल्या नाट्य संमेलनात याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. या नाट्य गृहाचे 100% श्रेय सत्यवान तेटांबे यांना जाते असा जाहीर गौरव दिवाकर रावते यांनी केलेला आहे. बोरवलीच्या नाट्यगृहाच्या उभारणीच्या कामाला गती यावी म्हणून तेटांबे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा बोरवली येथे सुरू केली. या बोरवली नाट्य परिषद शाखेचे पहिले अध्यक्षही सत्यवान तेटांबे हे होते. मुुबईतील अप्पा पाडा, आनंद नगर, मालाड या ठिकाणी विजेेची,लाईटची सोय नव्हती, रस्ते तसेच इतर सोयी सुविधाही नव्हत्या. सुधाकरराव नाईक हे त्यावेळी ऊर्जामंत्री असताना त्यांच्याकडे तेटांबे यांनी पाठपुरावा करून प्रयत्न करून या सर्व सुविधा तेेटांबे यांनी या भागात उपलब्ध करून दिल्या. याबद्दल या भागातील रहिवाशी आजही तेटांबे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. तेटांबे यांचे जन्मगाव रत्नागिरी जि. चिपळूण ता. मांडकी हे आहे. येथे स्वातंत्र्य पूर्व काळापासून महिला,पुरुषांना एक मैलावरून डोक्यावर हंडे ठेवून पाणी आणावे लागत असे.पाण्याची ही तीव्र समस्या सोडविण्यासाठी माजी मंत्री माजी खासदार हुसेन दलवाई यांच्याकडे तेटांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून मांडकी गावात अशक्यप्राय वाटणारी नळ पाणी योजना साकारली.मांडकी गावाचा हा पाण्याचा प्रश्न चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी सोडविला. अशी शेकडो समाजोपयोगी कामे तेेटांंबे यांनी गेल्या 50 – 60 वर्षात केलेली आहेत. लोकप्रतिनिधींना एखादा प्रश्न सुटला नाही तर काही लोकप्रतिनिधी तेटांबे यांच्याशी संपर्क साधत. एक गोष्ट येथे आवर्जून सांगण्यासारखी आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना मुंबईत जोगेश्वरी,ओशिवरा येथील हजार दोन हजार झोपड्या तोडण्याची ऑर्डर निघाली होती.तेंव्हा त्या भागातील लोकप्रतिनिधी होत्या इंदूमती पटेल. त्यांनी तेटांबे यांच्याशी संपर्क साधला. व त्या तेटांबे यांना म्हणाल्या “आता मी काहीच करू शकत नाही”. “महापौर,आयुक्तही काहीच करू शकणार नाहीत,कारण महाराष्ट्र शासनाची ऑर्डर आहे”. तेटांबे तेंव्हा महिंद्र कंपनीत कांदिवली येथे नोकरी करीत होते. झोपड्या तोडल्या तर गोरगरिब रस्त्यावर येतील, हे गांभीर्य तेटांबे यांनी ओळखले. याची बातमी पेपरला आली तरच सरकार जागे होईल. हे ओळखून तेटांबे यांनी पाच सहा दैनिकांना फोनवरून बातमी दिली. सध्या थंडीचे दिवस आहेत. या झोपडीधारकधारकांना प्रथम पर्यायी जागा द्या. आणि नंतरच झोपड्या तोडा. अशा आशयाची बातमी ही नवाकाळ, नवशक्ती, संध्याकाळ , महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता व सकाळ इत्यादी पेपरात छापून आली. आणि आश्चर्य म्हणजे तेंव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी झोपड्या तोडण्याची दिलेली ऑर्डर तात्काळ मागे घेतली. तेटांबे यांचा स्वभाव म्हणजे हाती घेतलेले काम अर्धवट सोडायचे नाही.ते काम पूर्णत्वास न्यायचे ही त्यांची खासियत. म्हणूनच अनेक लोकप्रतिनिधींनाही लाजवेल अशी अनेक कामे सत्यवान तेटांबे हे करू शकलेले आहेत म्हणूनच तेटांबे यांना जीवनगौरव पुरस्कारासह अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविलेले आहे. सत्यवान तेटांबे यांचे अनेक सिने,नाट्य अभिनेते , राजकीय नेत्याशी निकटचे संबंध आजही आहेत. तेटांबे कोणत्याही नेत्याकडे गेले की त्यांना मंत्र्याच्या केबिनमध्ये जाण्यासाठी त्यांना कधी प्रतिक्षा करावी लागत नसे.तेटांबे आलेत,हे दोन शब्द आमदार,खासदार, मंत्री, नेते यांच्या कानावर जाताच त्यांना त्वरीत आत बोलावले जात असे. काही वर्षापूर्वी तेटांबे हे सहज म्हणून मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यास गेले. पण मातोश्री बाहेर अनेक कार उभ्या होत्या.पोलीस बंदोबस्त होता.बडी असामी आलेली आहे ..असे समजून तेटांबे मातोश्रीवरुन माघारी फिरले..तोपर्यंत तेटांबे आलेत हे बाळासाहेबांना समजताच त्यांनी तेटांबेंना बोलवा,असा निरोप पीए राजे व थापा यांना दिला. घरी परतणाऱ्या तेटांबेना आवाज देऊन मातोश्रीवर पुन्हा बोलावले.. तेंंव्हा मातोश्रीवर अभिताभही होते. त्यांच्याकडे पाहत बाळासाहेब म्हणाले बच्चनजी यह है सत्यवानजी तेटांबे… यह शख्स तुम्हारे सिने इंडस्ट्रीज मे पॉप्युलर है.. ओ सिने कलाकारों के अ‍ॅड्रेस , फोन की डायरी निकालता है… यावर अभिताभ बच्चन बोलले…अच्छा..नाईस.. आपको हमारा प्रणाम…यानंतर बाळासाहेब मध्येच म्हणाले… सत्यवान अभिताभ यांचे नाव पत्ता तुझ्या डायरीत आहे का?,..यावर ते म्हणाले आहे की… बाळासाहेब म्हणाले मोठ्याने वाचून दाखव बच्चनजींना. अभिनेते अभिताभ बच्चन- प्रतिक्षा बंगला,दहावा रोड, मुंबई – हे ऐकून बच्चनजींना तेटांबेविषयी खूप अभिमान,गर्व वाटला.तेेटांंबेंनाही समाधान वाटले. अशा सिने नाट्य क्षेत्रातील असंख्य नेते, अभिनेते, अभिनेत्री व कलाकार यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता.परंतु या संबंधाचा उपयोग त्यांनी कधीही व्यक्तिगत स्वार्थासाठी केला नाही.. उलट आपला जो संबंध पत्रकार, सिने नाट्य साहित्यकोशचे निर्माते म्हणून नेते, अभिनेत्यांशी आला.त्याचा उपयोग त्यांनी समाजाच्या भल्यासाठी केल्याचे दिसून येत आहे.आज ते 81 वर्षाचे आहेत. 1 जून 2024 ते 82 व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. तरीही अजुनही ते कार्यरत आहेत.लवकरच ते अत्रे जयंती विशेषांक प्रसिद्ध करणार आहेत.. याचबरोबर ते दरवर्षी प्रसिद्ध करीत असलेल्या तीन दिवाळी अंकाचीही त्यांनी तयारी सुरू केलेली आहे.तरुणांना लाजवेल असे त्यांचे काम सध्या सुरू आहे.. अशा या ज्येष्ठ पत्रकारास , सामाजिक कार्यकर्त्यास 82 व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा… पत्रकार नारायण जाधव-9819566667- Email: narayandj@rediffmail.com

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments