प्रतिनिधी : दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदानाच्या २११ एकर जागेपैकी १२० एकर जागा लवकरच पालिकेच्या ताब्यात येणार आहे. ही हस्तांतर प्रक्रिया दोन आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ही १२० एकर जागा ताब्यात आल्यानंतर याठिकाणी सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असल्याचे राज्य सरकार व मुंबई महापालिकेने यापूर्वीच जाहीर केले आहे. तसेच मेट्रो स्टेशनचा भूखंड तसेच आणि घोड्यांसाठी स्विमिंग पूल असलेल्या जागांचे सीमांकन करणे बाकी आहे. रेसकोर्सची एकूण २११ एकर जमीन आरडब्ल्यूआयटीसीला भाडेपट्टीवर दिली होती. तिची मुदत संपल्यानंतर या जागेपैकी १२० एकर जागा राज्य सरकारमार्फत पालिकेला देण्यास मान्यता देण्यात आली आहे तर उर्वरित ९१ एकर जागा आरडब्ल्यूआयटीसीला पुन्हा दिली जाणार आहे. पालिकेला मिळणारी १२० एकर तसेच रेसकोर्स परिसराला लागून असलेली कोस्टल रोड प्रकल्पाची १७० एकर अशा दोन्ही मिळून एकूण ३०० एकर जागेवर मुंबई सेंट्रल पार्क विकसित केले जाणार आहे.
दरम्यान, पालिका महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकरची जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडून ताब्यात घेण्याची योजना आखत असल्याने अमेच्योर रायडर्स क्लबचे भविष्य अनिश्चितेत अडकले आहे. कारण या एकमेव क्लबमध्ये
तरुणांना घोडेस्वारी आणि पोलोसारखे खेळ शिकवले जातात. त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्समध्ये या क्लबचा समावेश करावा, अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.