प्रतिनिधी : मुंबईतील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) मेट्रो 3, एक्वा लाइनचा पहिला टप्पा सुरू करण्याची तयारी करत आहे. अहवालानुसार, मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा जुलैपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यात आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यान मेट्रो धावणार आहे. सध्या आरे डेपोचेही 99.5 टक्के काम पूर्ण झाले आहे. आरे डेपो 30 हेक्टरमध्ये पसरलेला आहे, त्यापैकी स्टेशन आणि डेपोमध्ये 25 हेक्टर जागा व्यापलेली आहे आणि उर्वरित 5 हेक्टर इतर वापरासाठी आहे. जिथे मेट्रोच्या देखभाल, संचालन, प्रशासन आणि प्रशिक्षणाच्या सुविधा आहेत.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे ट्रेन ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यासाठी बॅकअप ऑपरेशन आणि कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. मेट्रो 3 ही लाईन कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी 33.5-किमी लांबीची आहे. हा भूमिगत कॉरिडॉर आहे. कॉरिडॉरवर 27 स्थानके असून, त्यातील 26 भूमिगत आणि एक जमिनीवर आहे. सध्या, पहिल्या टप्प्यासाठी चाचण्या सुरू आहेत. फेज 1 च्या कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट जवळजवळ तयार, असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.