मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या विकासात महत्वाचा असलेल्या कोस्टल रोडच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे पहिल्याच पावसाळ्यात उघड झाले आहे. करोडो रुपयांच्या कोस्टल रोडचे
दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले असून इतक्या लवकर दुरावस्था कशी काय झाली? हे कसले दर्जेदार काम याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला द्यावेच लागेल, असा प्रश्न विचारून बोगद्यात लागलेल्या गळतीची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
कोस्टल रोड प्रश्नी शिंदे-भाजपा सरकारवर हल्लाबोल करत वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, पावसाळा अजून सुरू ही झाला नाही आणि कोस्टल रोडच्या बोगद्यात गळती लागली असून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपू लागले आहे. पावसाळ्यात काय होईल कोणास ठाऊक? आधी अतिशय मंद गतीनं काम करायचे, कामाचा खर्च वाढवायचा आणि नंतर निवडणुका तोंडावर आल्या की कामांचे श्रेय लाटण्यासाठी घाईगडबडीने अर्धवट झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करायचे, जनतेशी केलेल्या या चेष्टेचे उत्तर शिंदे सरकारला द्यावेच लागेल. महायुती सरकारने या प्रकल्पाच्या कामात दिरंगाई केली, त्यामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढला. जनतेचा एवढा पैसा अक्षरशः पाण्यात वाहून गेल्यासारखा आहे. याची जबाबदारी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली पाहिजे.
गळतीबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी तांत्रिक कारणे पुढे केले पण ही सारवासारव व सबब खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या पैशाने उभारलेल्या प्रकल्पाचे सुरक्षेच्या अनुषंगाने सर्वच बाबींची खबरदारी घेऊन दर्जेदार काम झाले पाहिजे. अशा पद्धतीच्या हलगर्जीपणामुळे जनतेचे जीव धोक्यात येऊ शकतात. काँग्रेसच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या कोस्टल रोडचे श्रेय लाटण्यासाठी अर्धवट अवस्थेतील रस्त्याचे उद्घाटन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आले.
जर प्रकल्पांचे श्रेय लाटण्याची हौस आहे तर त्या प्रकल्पांतील त्रुटींची जबाबदारी देखील घ्यायला शिकले पाहिजे. पण महायुती सरकार फक्त इव्हेंटबाजी करण्यातच माहिर आहे. कोस्टल रोडलाही भ्रष्टाचाराची कीड लागलेली असून निकृष्ट कामामुळे या महाभ्रष्ट युती सरकारची पोलखोल केली आहे असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.