सातारा(अजित जगताप) : सध्या सोन्या इतकाच भाव जमिनीला आल्यामुळे प्रत्येकाला”””” दो बिघा जमीन””””’ शक्य नसले तरी””””’ गुंठे पाटील””’ होण्यात मनस्वी आनंद वाटत आहे. पण, वारसदार व भावकी, हिस्सेदार वाढल्यामुळे आता बांधावरील वाद न्यायालयात गेले आहे कारण , जमीन वाढत नाही. अशा वेळेला आपल्या वाटणीची जमीन मोजणीसाठी अनेक जण भूमी अभिलेख कार्यालयात ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतात. सातारा जिल्ह्यातील भूमी अभिलेखा कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे सातारा जिल्ह्यात किमान प्रत्येक गावातील पाच ते दहा मोजणी अर्ज प्रत्यक्षात शेतात जाऊन मोजणी करण्यास असमर्थ ठरलेले आहेत. त्यामुळे जमीन मोजणी म्हणजे तारीख पे तारीख असा आता खेळ सुरू झालेला आहे. याबाबत ना काही शेतकरी संघटनेचे लक्ष… ना लोकप्रतिनिधीला वेळ… ना याबाबत खुली चर्चा होताना दिसत आहेत. सातारा जिल्ह्यात भूमि अभिलेख कार्यालय प्रत्येक तालुक्यात आहे. एकूण सातारा जिल्ह्याचे दहा हजार चारशे ऐंशी चौरस किलोमीटर आहे. १७३९ खेडी व पंधरा शहरे आणि २२ खेडी ओसाड अशी जनगणना २००१ साली झाली होती. आता त्यामध्ये पंधरा पट वाढ झालेली आहे. या सर्वांची सॅटेलाईट असू अथवा ड्रोन च्या साह्याने कधीतरी मोजणी होईल. परंतु, तोपर्यंत अनेकांना शेतजमिनीच्या मोजणी अभावी न्यायालयात दिवाणी दावा खेळावा लागत आहे. या पाठशिवनीच्या खेळामध्ये इकडे तारीख पे तारीख आणि तिकडेही तारीख पे तारीख अशा पद्धतीने शेतकरी वर्गाची अवस्था झाली आहे. ऑनलाइनच्या सातबारावर मूळ पुरुष व वारस हक्काने निर्माण झालेले वारसदार यांची जर आकडेवारी पाहिली तर एका सातबारा वर किमान २५ ते ५० वारसदार नोंदवावी लागत आहेत. तर मयत वारसदारांच्या नोंदी सुद्धा सापडत आहेत पुन्हा त्यांच्या वारसदारांची नावे लावली जात आहेत .शेत जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करताना मोजणी पासून ते दस्त घेण्यापर्यंत साठेखत, खुशखरेदी खत व इतर गोष्टींसाठी अगदी स्वतःच्या घरातले कार्य समजून अनेक जण झटत असतात. पण शेत जमिनीच्या मोजणी बाबत असा पाठपुरावा करण्यास कोणी पुढे येत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाला जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना लॉगिन करताना दिलेला आय.डी. आणि पासवर्ड हा लक्षात ठेवावा लागत आहेत .विशेष बाब म्हणजे हा आयडी आणि पासवर्ड देणे हे शेतकऱ्यांच्या हाती नसून संबंधित कर्मचाऱ्यांच्या हाती असल्यामुळे वास्तविकतेची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांनी ठेवणे किंवा ऑनलाईन प्रक्रिया करणाऱ्यांनी रजिस्टरला नोंद करून त्यासाठी वेगळा फॉर्मुला तयार करणे शक्य आहे. तातडीची मोजणी हा विषय तातडीचा असला तरी बराच वेळा त्याला विलंब होत आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्ती याचबरोबर अधिकारी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि वशिलेबाजी याचा चांगलाच पेव फुटलेला आहे. या अडचणीचे गुरु म्हणजे महा-ई- सेवा केंद्रातील सर्वर डाऊन होणे हा दुष्काळातील हमखास तेरावा महिना ठरलेला आहे. माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले पण मोजणे अभावी शेत जमिनीवर पाऊल ठेवणे कठीण झालेले आहे. यामुळे आता शेतकरी वर्ग चिंतेत आहे मूळ वारसदाराची इच्छा आहे की आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक बहिण- भावंडांना जमीन वाटून दिले म्हणजे त्यांच्या भविष्यात वादीवाद होणार नाही. न्यायालयाची पायरी चढावी लागणार नाही. अशी अपेक्षा असते आणि ही अपेक्षा रास्त असली तरी भूमी अभिलेखा विभागाकडे मोजणीची प्रकरणे प्रलंबित होणे. हा एक कामकाजाचाच भाग झालेला आहे .
सातारा जिल्ह्यात वीस वर्षांपूर्वी १०.५८ लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्र होते . ७.९९ लाख हेक्टर लागवडीसाठी उपयुक्त होते .सध्या कोयना, कुडाळी, उरमोडी, वसना, येरळा, ताराळी, कृष्णा नदीतील पाण्यावर प्रकल्प राबवल्यामुळे शेतजमीन ओलिताखाली येण्यासाठी खूप मदत झालेली आहे. आता शेत जमिनीला चांगलाच भाव आलेला आहे. त्याचबरोबर शहरीकरणही वाढले आहे . खुली जमीन त्याचे बाजार भावाचे दर व सरकारी दर आणि दलालांचे कमिशन असे सर्व मिळून सध्या जमिनीचे भाव हे सोन्यासारखे वाढत चाललेले आहे. .तालुकास्तरावर किती अर्ज प्राप्त झाले? किती तातडीची मोजणी झाली? किती मोजणी शिल्लक आहे? हे सांगण्याचे सौजन्य सुद्धा दाखवले जात नाही .अनेक निवेदन दिले जातात. प्रसारमाध्यमाकडे धाव घेतली जाते .पण ,शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले. वेळेत मोजणी झाली. असे कधीही प्रेस नोट काढून भूमी अभिलेखा कार्यालयाने आपल्या कामकाजाची मोजणी केलेली नाही.
सध्या शासकीय भूमी अभिलेखा कार्यालयातील कामकाजाकडे तटस्थपणे पाहणारे व खाजगीकरणाला प्रकट विरोध असणारे सुद्धा शेतजमीन व जागेची मोजणी करण्यासाठी खाजगीकरणातून प्रयत्न केल्यास त्याला पाठिंबा देणे. हाच उपाय असल्याचे मोजणीसाठी ताटकळत असणारे शेतकरी वर्ग बोलू लागलेले आहेत. शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब चव्हाण व शेतमजूर तसेच भूमिहीन अल्पभूधारक अशा शेतकऱ्यांच्या बाबत जावली तालुका पंचायत समितीचे उपसभापती व रामफूल कृषी पर्यटन सोमर्डी तालुका जावळी येथील केंद्र चालक रवींद्र रामराव परमणे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर यांनी व्यक्त केले आहे.
चौकट- जमिनीची मोजणी करण्यासाठी रोव्हर मशीन थेट उपग्रहाची जोडल्यामुळे मोजणी प्लॅन टेबलवर, ईटीव्हीएस मशीन पेक्षा जलद गतीने होत आहे. दोन वर्षांपूर्वी ती कार्यान्वित करण्यात आली आहे पण जमिनीच्या मोजणीची वाढत्या मागणीमुळे हे यंत्रणा तोकडी पडू लागलेले आहे. ठाणे नवी मुंबई व पुणे आणि मोठ्या शहरांमध्ये परिसरात अशा पद्धतीने मोजणी होत आहे. ही पद्धत सातारला येण्यासाठी आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे.