ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. १४ जून २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
नाट्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रंगकर्मीचा नाट्य परिषदेच्या वतीने सत्कार केला जातो. त्यानिमित्ताने यंदा कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. १०० वे नाट्य संमेलन नुकतचे पार पडले. या नाट्य संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘नाट्य कलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिकप्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्य संगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. कै. शाहीर साबळे, कै. सुधीर भट, कै. स्मिता तळवळकर आणि कै. आनंद अभ्यंकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्य परिषदेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.