प्रतिनिधी : पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करत असते. मात्र कधीकधी संभाषण, पत्रव्यवहार किंवा इतर सेवांमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्यास पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी करण्याची वेळ सामान्यांवर येते. मात्र बऱ्याच वेळा या तक्रारींची दखल घेतली जात नाही. याचमुळे महाराष्ट्र सर्कल मुंबई द्वारे 21 जून रोजी दु. 3 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचवा मजला, जी.पी.ओ. इमारत, मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये 127 वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
या डाक अदालतीमध्ये पोस्टाचे महत्त्वाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलांसह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी माहिती असावी.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाकसेवा (ज. शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. इमारत, चौथा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे दोन प्रतिंसह दिनांक 7 जून पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.