कल्याण : कल्याण पश्चिमेतील रामदास वाडी परिसरात असलेल्या दोन मजली इमारतीमधील घराला भीषण आग आगीत घटना घडली. या आगीमध्ये घराचे प्रचंड नुकसान झाले असून गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी एल एन एन शी बोलताना दिली आहे. तर सुदैवाने या आगीमध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
येथील रामदासवाडी परिसरात मैत्रेय नावाची दोन मजली इमारत असून त्यामधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या चौधरी कुटुंबाच्या घरामध्ये ही आग लागली. सुदैवाने घरामध्ये कोणीही नसल्याने कोणाला दुखापत झाली नाही. मात्र ही आग इतकी भीषण होती की त्याच्यामध्ये संपूर्ण घर भस्मसात झाले. तसेच घरातील सिलेंडरचाही स्फोट झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.
तर ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही.
दरम्यान केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. आणि परिसरातील वीज पुरवठाही तात्पुरता बंद करण्यात आला.