सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहराने राजकीय पटलावर अनेक वर्ष मोठा संघर्ष अनुभवला आहे. या संघर्षाला मूठमाती देऊन सातारच्या छत्रपती घराण्यातील राजे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये मनो मिलन वज्रमुठ निर्माण केली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत असतानाच शाहूपुरी मध्ये सुद्धा दोन निष्ठावंत मावळ्यांच्या मनोमिलनाच्या छबीने समाधानाचे वातावरण पसरले आहे.
. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या भारतीय जनता पक्षाने साताऱ्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीकडे उमेदवारी मागणीसाठी मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उपस्थित नसले तरी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भाजप व सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीला मानणारे समर्थक एकत्र जमले होते. खऱ्या अर्थाने मनोमिलनाचे वारे वाहत होते.
साताऱ्यातील राजकारणामधील संघर्ष विसरून एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कळत नकळत हालचाली करून समर्थक अंदाज घेत होते. सातारा नगरपालिकेसाठी ५० नगरसेवक- नगरसेविका निवडून देत असताना आरक्षणाचा ही विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर पक्षाशी व नेत्यांशी असलेली बांधिलकी पाहूनच उमेदवारी देण्यात येणार आहे. हे जरी खरे असले तरी उमेदवाराचे सामाजिक योगदान व विकास कामाबद्दल असलेली तळमळ आणि महत्त्वाचे म्हणजे नगरपालिका ही लोकांच्या कल्याणासाठी काम करणारी संस्था आहे. ठेकेदारीसाठी नाही. या गोष्टीचाही प्रथमच विचार केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
हा धागा पकडून गुणवंत व सामाजिक जाण आणि प्रशासकीय अनुभव या बाबींचा उमेदवार निवडताना विचार करावा लागणार आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नूतनीकरण, अनुकंपा योजना किंवा वारस नोंदणी नसून ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे. कर्तबगार आहे. जिद्द व प्रामाणिकपणा आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे निवडून येण्याची पात्रता आहे. अशांचा विचार होण्याची शक्यता आहे. हे जरी खरं असले तरी मनोमिलनाचा धागा पकडूनच काही निर्णय होणार आहे.
साताऱ्यातील नेत्यांनी मनोमिलन करून खऱ्या अर्थाने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे. परंतु साताऱ्यामध्ये सातारा व नगर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात मनोमिलन खुशीने दिसून आले तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही अनेकांच्या चेहऱ्यावर राजकारणाची बारीक छबी लपून राहिलेली नाही.
अशा या वातावरणात शाहूपुरीतील दोन दिग्गज नेते म्हणजे सातारा विकास आघाडीचे संजय पाटील व नगर विकास आघाडीचे अक्षय जाधव यांची उपस्थिती सर्वात लक्षणीय ठरली.
आघाडी व भाजप मधील इच्छुक उमेदवार यामध्ये सावता सुभा दिसून येत असताना आपल्या नेत्यांनी केलेल्या मनोमिलनांमुळे आपणही एकत्र आहोत. एकत्र निर्णय घेऊन पुढील वाटचाल केली जावी. अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. त्याचे प्रतिबिंब म्हणून शाहूपुरी मधील श्री पाटील व श्री जाधव यांच्या निदान शारीरिक मनमिलनामुळे खऱ्या अर्थाने नेत्यांचा आदेश मानल्याचे दिसून आले आहे. निवडणुकीच्या उमेदवारी जाहीर होण्यास काही कालावधी आहे. ज्यांना संधी मिळेल ते निश्चितच संधीचे सोने करतील. ज्यांनी विकास केला आहे. त्यांच्याकडे नेत्यांचे बारकाईने लक्ष आहे. शेवटी नेते जरी निर्णय घेणार असतील तरी शाहूपुरीतील दोन दिग्गज मावळ्यांनी सुद्धा मनोमिलन केल्याने नेत्यांना आता निर्णय घेणे सोपं झाले आहे. हे मात्र खरे होणार आहे. यावेळी शाहूपुरीतील प्रतिष्ठित रहिवाशी श्री . निलेश धनावडे, भरत भोसले ,अजित जगताप, ज्ञानेश्वर येडे, राजेंद्र कोंडे, महेंद्र गायकवाड व नंदकुमार काटे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. त्यांनाही या मावळ्यांच्या मनोमिलनाच्या छबीचा सुखद धक्का दिला आहे. दोन्ही निष्ठावंत कार्यकर्ते कम मावळ्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वासाने त्यांच्या तयारीचाही अंदाज अनेकांना आला आहे. त्यांच्या समर्थक सुद्धा यानिमित्त सुखावले आहेत.
—— ———- ——– —
फोटो — साताऱ्यात भाजप खासदार आमदार यांच्यामध्ये मनोमिलन झाल्यानंतर शाहूपुरीतील दोन दिग्गज मावळ्यांचे मनोमिलन पाहण्यास मिळाले. (छाया– निनाद जगताप, सातारा)
.
——– ————————–
