सांगली : बैलगाडा शर्यतींनी महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला अक्षरशः नवं बळ दिलं आहे. एकेकाळी ५० हजार रुपयांचा बैल आज ३ कोटीपर्यंत विकला जातो, तर या शर्यतींची उलाढाल तब्बल १०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. लवकरच हा आकडा ५०० ते १००० कोटींपर्यंत जाणार असल्याचे प्रतिपादन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सांगलीतील बोरगाव येथे झालेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हेलिकॉप्टर मधून शर्यतीचा आस्वाद घेतला. यावेळी आयोजकांच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २५ लाखांची मदत उपमुख्यमंत्री शिंदे यांना सुपूर्द करण्यात आली.
शिंदे म्हणाले “बैलगाडा शर्यत म्हणजे केवळ परंपरा नाही, तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेचा नवा इंजिन आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या गोधनावरील प्रेमाचं आणि गावागावांतील एकतेचं हे जिवंत प्रतीक आहे.”
या शर्यतीमुळे गावागावात नवा रोजगार निर्माण झाला आहे. बैल प्रशिक्षण केंद्रं, शर्यतींसाठीचे मैदानं, खाद्य व औषध व्यवसाय, तसेच वाहन व सजावटीच्या वस्तूंची मागणी प्रचंड वाढली आहे. परिणामी, ग्रामीण भागात शेकडो कोटींची उलाढाल सुरू झाली असून, शेतकऱ्यांसाठी हे एक नवीन उत्पन्नाचं साधन बनलं आहे.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या श्रीनाथ केसरी शर्यतीत देशभरातून अडीच हजार चालकांनी सहभाग घेतला. तब्बल ५ लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत मैदान अक्षरशः दणाणून गेलं. विजेत्यांसाठी दोन फॉर्च्युनर, दोन थार, सात ट्रॅक्टर आणि १५० टू-व्हीलर अशी बक्षिसांची लयलूट होती. महिलांसाठी स्वतंत्र शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आणि १०० गाईंचं वाटप करण्यात आलं. ग्रामीण बैलांच्या सन्मानाचं हे अद्भुत उदाहरण ठरलाचे गौरव उद्गार एकनाथ शिंदे यांनी काढले.
शिंदे म्हणाले, “बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सरकार तिचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी वचनबद्ध आहे.”
पूर्वी न्यायालयीन बंदीमुळे थांबलेल्या या परंपरेला पुन्हा नवसंजीवनी मिळवून देण्यात आमच्या सरकारचे योगदान महत्त्वाचं ठरलं आहे. आता शर्यतींचा दर्जा वाढवून त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.
शिंदे म्हणाले “जसं हॉर्स पोलो खेळ जगभर पोचला, तसं बैलगाडा शर्यतींचंही ब्रँडिंग आपण करणार आहोत. स्पेन, इटली, रशिया अशा देशांतही महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यती दिसल्या, तर आश्चर्य वाटायला नको.”
त्याप्रसंगी मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई,चंद्रहार पाटील यांचे वडील सुभाष पाटील, डबल महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक चंद्रहार पाटील, जिल्हाध्यक्ष संजय विभुते, अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी आणि बैलगाडा शर्यत प्रेमी लाखोच्या संख्येने उपस्थित होते.
