मुंबई : राज्यातील महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक मदत देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे योजनेत पारदर्शकता राखली जाणार असून, आतापर्यंत सुमारे ८० लाख महिलांनी ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-केवायसीची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अनेक लाभार्थी महिलांना ओटीपी न मिळणे, संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणी यांसारख्या समस्यांमुळे प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार अंतिम मुदत वाढविण्याचा विचार करत आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
निराधार, विधवा आणि घटस्फोटीत महिलांना ई-केवायसी करताना अडचणी येत असल्याने, त्यांच्यासाठी स्वतंत्र पडताळणी प्रक्रिया आणि पर्यायी सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. त्यांनी आश्वासन दिले की, “१८ नोव्हेंबर नंतरही पात्र महिलांना वंचित राहू दिले जाणार नाही; सकारात्मक निर्णय घेतला जाईल.”
ई-केवाय सी प्रक्रिया कशी कराल?
लाभार्थी महिलांनी मुदत वाढीची वाट न पाहता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी त्वरित पूर्ण करावी. https://ladakibahin.maharashtra.gov.in
संकेतस्थळावर जाऊन E-KYC बॅनरवर क्लिक करा.
पहिला टप्पा – आधार पडताळणी: स्वतःचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून, आधार-लिंक मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit करा.
दुसरा टप्पा – कुटुंब पडताळणी: पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करा व त्यांच्या मोबाईलवरील OTP टाकून Submit करा.
प्रमाणपत्र (Declaration): जात प्रवर्ग निवडा, ‘शासकीय नोकरी नाही’ आणि ‘कुटुंबातील केवळ १ विवाहित व १ अविवाहित महिला लाभ घेत आहे’ या बाबी प्रमाणित करा.
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
