प्रतिनिधी : भारताचे राष्ट्रीय गीत “वंदे मातरम्” याला यंदा १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या आवाहनानुसार देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या कार्यकारी मंडळातर्फे आज “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताचे सामुदायिक गायन मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाची संकल्पना श्री. रवींद्र नेने यांची होती, तर गायनाचे मार्गदर्शन श्री. संतोष थळे आणि गायन शिक्षक श्री. स्वरूप यांनी केले. केवळ एका तासाच्या सरावानंतर सर्व सभासदांनी अत्यंत उत्तम प्रकारे हे गायन सादर केले. त्यांच्या सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“वंदे मातरम्” या गीताचा इतिहास १८७६ सालापासून सुरू होतो. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत या गीताचा समावेश केला होता. २४ जानेवारी १९५० रोजी “जन गण मन” हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले, तर “वंदे मातरम्” ला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान सदस्यांनी देशभक्तीच्या भावनेने भारावून *“वंदे मातरम्”*चा गजर केला. हा उपक्रम राष्ट्रप्रेम, एकता आणि सांस्कृतिक अभिमान यांचे सुंदर दर्शन घडवणारा ठरला.
