पुणे : जैन बोर्डिंग जमीन प्रकरणानंतर आता आणखी एका प्रचंड सरकारी जमीन व्यवहाराने राज्य राजकारणात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख होत असून, १८०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटींमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सरकारी जमीन ‘अमीडिया होल्डिंग्स एलएलपी’ या पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केल्याचे समोर आले आहे. एवढी प्रचंड किंमतीची जमीन अवघ्या काहीशे कोटींमध्ये विकली गेल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे.
या प्रकरणाची दखल घेत राज्य प्रशासनाने तातडीने कारवाई करत पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि उपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित केले आहे. तसेच अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
सर्वात मोठा धक्कादायक खुलासा म्हणजे या व्यवहारासाठी साधारण २५ कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार असताना, केवळ ५०० रुपयांतच नोंदणी पूर्ण करण्यात आली! त्यानंतर अवघ्या ४८ तासांतच स्टॅम्प ड्युटी माफीचा निर्णय मंजूर करण्यात आला.
दरम्यान, या व्यवहारात पेरमाउंट इन्फ्रा स्ट्रक्चर तर्फे शीतल तेजवानी यांनी सादर केलेल्या मुखत्यारपत्रातही करोडो रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडविल्याचा आरोप होत असून, चौकशीनंतर या प्रकरणाचा मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
