मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात राज्यातील डिजिटल दरी मिटवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्टारलिंकच्या उपाध्यक्षा लॉरेन ड्रेयर आणि आयटी विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या भागीदारीनंतर स्टारलिंकसोबत औपचारिक करार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या माध्यमातून राज्यातील दुर्गम व अल्पसेवित भागांतील शाळा, आरोग्य केंद्रे, आदिवासी भाग, वन चौक्या, किनारी क्षेत्रे आणि गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिमसारख्या जिल्ह्यांना उपग्रहाधारित इंटरनेट सुविधा दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्टारलिंकच्या सहकार्याने प्रत्येक गाव, शाळा आणि आरोग्य केंद्र डिजिटल संपर्कात येणार असून ‘डिजिटल महाराष्ट्र’ घडवण्याच्या दिशेने हे पाऊल ऐतिहासिक आहे.९० दिवसांच्या प्रायोगिक टप्प्यानंतर हा उपक्रम राज्यभर विस्तारला जाणार असून शिक्षण, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि किनारी सुरक्षेसाठी उच्च-गती इंटरनेटचा लाभ मिळणार आहे. स्पेसएक्सद्वारे संचालित स्टारलिंक ही जगातील अत्याधुनिक लो-अर्थ ऑर्बिट उपग्रहसंस्था असून ती जागतिक दर्जाची उपग्रह इंटरनेट सेवा पुरवते.
