Tuesday, November 4, 2025
घरमहाराष्ट्रआपत्ती निवारणाविषयी पथनाट्ये, अग्निशमनविषयक प्रात्यक्षिके यामधून व्यापक जनजागृती

आपत्ती निवारणाविषयी पथनाट्ये, अग्निशमनविषयक प्रात्यक्षिके यामधून व्यापक जनजागृती

प्रतिनिधी : आपत्ती कधी सांगून येत नाही, त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे असल्याचे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिनापासून पंधरवड्याच्या कालावधीत विविध जनजागृतीपर उपक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले. या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध वर्दळीच्या ठिकाणी तसेच गर्दी असलेल्या भागांमध्ये पथनाट्यासारख्या लोकप्रिय माध्यमाद्वारे 50 हून अधिक ठिकाणी आपत्तीविषयक जनजागृती करण्यात आली. यामध्ये आपत्ती उद्भवू नये याकरिता नागरिकांनी घ्यावयाची काळजी, आपत्तीपूर्व करावयाची तयारी, प्रत्यक्ष आपत्ती काळात घ्यावयाची खबरदारी, तसेच आपत्तीनंतर करावयाच्या उपाययोजना याविषयी हसत खेळत नाट्यमय मनोरंजक स्वरूपात माहिती देण्यात आली व जागरूकता निर्माण करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘आपत्तीमध्ये काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शक माहिती असलेली हस्तपत्रके नागरिकांमध्ये वाटप करण्यात आली, ज्यामुळे अधिक प्रभावी रितीने जनजागृती झाली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या पथनाट्य उपक्रमासोबतच अग्निशमन विभागामार्फत नवी मुंबईतील मॉल्स, शाळा, महाविद्यालये, उंच इमारती तसेच गजबजलेल्या ठिकाणी विशेष जनजागृतीपर कार्यक्रम प्रात्यक्षिकांसह राबविण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना व संस्थांना अग्निशमन यंत्रणांची माहिती देण्यात आली. सोबतच प्राथमिक पातळीवरील आग प्रतिबंधक उपाययोजना तसेच अग्निशमन उपकरणे योग्यरित्या हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके सादर करण्यात आली व उपस्थित नागरिकांचा प्रत्यक्ष सराव घेण्यात आला
या जनजागृतीपर उपक्रमामध्ये अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली व उपआयुक्त श्रीम.ललिता बाबर यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभाग, शहर अभियंता तथा अग्निशमन विभागाचे प्रमुख श्री.शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली अग्निशमन विभाग यांचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिक यांचा सर्वच ठिकाणी उत्स्फुर्त सहभाग होता. नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांमध्ये आपत्तीबाबत सजगता आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध कार्यक्रम राबवत असून, जागरूक आणि सुरक्षित नवी मुंबई घडविणे हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments