मुंबई : राज ठाकरे यांना फक्त हिंदू आणि मराठी दुबार मतदार दिसतात, मात्र अनेक मतदारसंघांतील मुस्लीम दुबार मतदार दिसत नाहीत. त्यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, असा घणाघात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
ॲड. शेलार म्हणाले, “भाजप कधीच मतदारांमध्ये भेद करत नाही, पण मविआ आणि नवा भिडू राज ठाकरे जाती-धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडत आहेत.” त्यांनी 31 विधानसभा मतदारसंघांचे विश्लेषण सादर करत सांगितले की, 2 लाख 25 हजार 791 मुस्लीम आणि ख्रिश्चन दुबार मतदार आढळले असून राज्यातील आकडा 16 लाखांहून अधिक असू शकतो.
कर्जत-जामखेड, लातूर, माळशिरस, धारावी, मुंबादेवी, मालाड पश्चिम, जोगेश्वरी पूर्व आदी मतदारसंघांमध्ये हजारोंच्या संख्येने दुबार मतदार असून, अनेक मविआ आमदारांचा विजय ह्याच मतांमुळे झाल्याचा आरोप त्यांनी केला. “एकाच फोटोचा वापर करून फक्त नावे बदलण्यात आली, असा मोठा घोटाळा मविआने केला आहे,” असे शेलार म्हणाले.
विरोधकांनी सत्याच्या मोर्चातून खोटे कथन करून जनतेची दिशाभूल केली, असा आरोप करत शेलार म्हणाले, “भाजपाची भूमिका स्पष्ट आहे – सर्वांना न्याय, कुणाचेही तुष्टीकरण नाही.”
त्यांनी इशारा दिला की, “जे दुबार मतदार सापडतील, त्यांना आम्ही उघडे पाडणार.”
