मुंबई : सुरेल सुरांच्या मैफलीत माणुसकीचा अनोखा नजराणा पाहायला मिळाला. मुंबईतील शिवाजी मंदिर सभागृहात मुंबई मराठी पत्रकार संघ आणि विविध समाजसेवी संस्थांच्या पुढाकाराने आयोजित ‘एक पणती पूरग्रस्तांसाठी’ या विशेष कार्यक्रमात श्रोत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पूरग्रस्तांसाठी मदतीचा भक्कम निधी उभारला.
गायक मंगेश बोरगावकर यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुरावटींनी वातावरण भारावून गेले आणि श्रोत्यांनीही उदारतेने मदतीचा हात पुढे करून पूरग्रस्तांना आधार देण्याचा संकल्प केला. सोलापूर आणि मराठवाड्यातील पूरग्रस्तांचे जीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन मुंबई मराठी पत्रकार संघ, विहंग प्रतिष्ठान, पल्लवी फाउंडेशन, श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट (परेल), जीएसबी टेंपल ट्रस्ट आणि बालमोहन उत्कर्ष पालक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाला कॉसमॉस बँकेने प्रायोजकत्व दिले. विशेष म्हणजे गायक मंगेश बोरगावकर यांनी कोणतेही मानधन स्वीकारले नाही, तर श्री शिवाजी मंदिर ट्रस्टने सभागृह मोफत उपलब्ध करून दिले.
या प्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर आणि राजेंद्र हुंजे, विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, विहंग प्रतिष्ठानचे प्रसाद मोकाशी, पल्लवी फाउंडेशनचे संस्थापक भाऊ कोरगावकर, श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टचे प्रमोद सावंत आणि प्रा. हेमंत सुधाकर सामंत, जीएसबी टेंपल ट्रस्टच्या कल्पना प्रभू, तसेच बालमोहन उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर, सरचिटणीस दिपक घाडीगावकर आणि मुख्याध्यापिका सौ. संगिता फापाळे व्यासपीठावर उपस्थित होते.
या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेला निधी लवकरच पूरग्रस्त भागात पोहोचवण्यात येणार आहे — मानवी संवेदनेचा आणि सामाजिक जबाबदारीचा एक सुरेल संगम अशा शब्दांत या सोहळ्याचे वर्णन करता येईल.
