मुंबई : एफ. उत्तर विभागातील प्रतीक्षा नगर (प्रभाग क्रमांक 173) येथे “आठवड्यातील एक दिवस – दोन तास परिसर स्वच्छतेसाठी” या अभियानाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दक्ष नागरिक व पर्यावरणप्रेमी तानाजी घाग यांच्या पुढाकारातून तसेच संगम प्रतिष्ठान या संस्थेच्या सहकार्याने गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेली ही स्वच्छता मोहीम आता चौथ्या आठवड्यात प्रवेशली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या एफ. नॉर्थ विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभाग, परिक्षण खाते, पेस्ट कंट्रोल विभाग, अँटॉप हिल परिवहन विभाग तसेच वडाळा टी.टी. पोलिस स्टेशन यांचे सहकार्य मिळाल्याने या मोहिमेला अधिक वेग प्राप्त झाला आहे.
स्थानिक रहिवाश्यांनी परिसरातील स्वच्छता, आरोग्यविषयक सुधारणा आणि दुतर्फा पार्किंग या प्रमुख समस्यांबाबत समाधानाची अपेक्षा व्यक्त केली आहे. “दक्ष मुंबईकर म्हणून प्रत्येकाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा,” अशी भावना रहिवाश्यांमध्ये दिसून येते.
संगम प्रतिष्ठानच्या वतीने “चकाचक मुंबई” हे पथनाट्य सादर करून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. “प्रशासनाच्या सोबत लोकसहभाग मिळाल्यास ही चळवळ अधिक परिणामकारक ठरेल,” असे तानाजी घाग यांनी सांगितले.
या मोहिमेद्वारे पुढील सहा आठवड्यांत प्रतीक्षा नगर परिसर एक

आदर्श लोकाभिमुख स्वच्छता मॉडेल म्हणून उभा करण्याचा संकल्प श्री. तानाजी घाग यांनी व्यक्त केला आहे.
