भोर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील दुर्गम निगुडघर गावातील १२ वर्षीय आदिती पारठे हिने अवकाश क्षेत्रात थेट ‘नासा’पर्यंत झेप घेत सर्वांना थक्क केलं आहे. मर्यादित साधनसंपत्ती, कठीण परिस्थिती आणि ग्रामीण अडथळ्यांना मागे टाकत तिने अमेरिकेतील प्रतिष्ठित नासा दौऱ्यासाठी पात्र ठरून आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे.
संघर्षातून घडलेलं यश
आदितीचे वडील पुण्यात हमालीचं काम करतात, तर आई गावात शेतीत मदत करते. घरात ना संगणक, ना स्मार्टफोन – तरीही शिक्षणाविषयीच्या जिद्दीमुळे आदिती दररोज साडेतीन किलोमीटर पायी शाळेत जाते. अभ्यासाबरोबरच क्रीडा, वक्तृत्व आणि नृत्य यांतही ती नेहमीच आघाडीवर राहिली आहे.
विज्ञानाची आवड ठरली यशाचं गमक
पुणे जिल्हा परिषद आणि आयुका (IUCAA) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आयोजित विज्ञान परीक्षेत आदितीने चमकदार कामगिरी केली. तिच्या या यशामुळे तिला ‘नासा व्हिजिट प्रोग्राम’ साठी निवड करण्यात आली आहे. विज्ञान संशोधनाची आवड असलेल्या आदितीसाठी हे स्वप्नवत यश ठरलं आहे.
गावात आनंदाची लाट
आदितीच्या निवडीची बातमी गावात पोहोचताच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. तिच्या वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू तर साऱ्या गावात जल्लोषाचे स्वर उमटले. “आमच्या घरात कुणी विमानात बसलं नव्हतं, पण आमची लेक आता सात समुद्रापार जाणार आहे,” असं सांगताना वडील भावूक झाले. शाळेने आदितीला सायकल व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव केला असून, शिक्षकांनी लॅपटॉपसाठी मदत मिळवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
ग्रामीण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी कहाणी
आदिती पारठेची कहाणी ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणेचा दीप आहे. आर्थिक परिस्थिती वा भौगोलिक मर्यादा यशाच्या आड येत नाहीत, हे तिच्या उदाहरणातून सिद्ध झालं आहे. मेहनत, जिद्द आणि योग्य संधी यांच्या जोडीने स्वप्नांना पंख मिळतात, याचं आदितीचं यश जिवंत उदाहरण आहे.
