मुंबई : निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभार आणि मतदार यादीतील घोटाळ्यांविरोधात विरोधी पक्षांनी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘सत्याचा विराट मोर्चा’ आयोजित केला आहे. या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.
मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, तसेच इतर प्रमुख विरोधी नेते उपस्थित राहणार असून, हा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्रित विरोधकांची ताकद दाखवणारा ठरणार आहे.
मोर्चाची सुरुवात दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीट येथून होणार असून, मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई मनपा प्रवेशद्वाराजवळ हा मोर्चा थांबणार आहे.
मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना
मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याने आयोजकांनी प्रवास व सुरक्षेसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
पूर्व उपनगरातून येणारे:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) येथे उतरून रस्ता पार करावा. आराम हॉटेल (कॅपिटल सिनेमा) शेजारील रस्त्याने आझाद मैदान आणि बॉम्बे जिमखाना यामधील पायवाटेने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली येथून येणारे:
मध्य रेल्वेने आल्यानंतर वरीलप्रमाणे मार्ग अनुसरावा. फ्रीवेने आल्यास पी. डिमेलो रोडने जी.पी.ओ. जवळ उतरून फॅशन स्ट्रीटवर चालत यावे.
पश्चिम उपनगरातून येणारे:
चर्चगेट स्टेशनवर उतरावे. आयकर भवनाच्या गल्लीतून बॉम्बे हॉस्पिटल मार्गे फॅशन स्ट्रीटवर यावे.
मेट्रोने येणाऱ्यांनी हुतात्मा चौक स्टेशन येथे उतरावे.
वाहनाने येणारे:
कोस्टल रोडने येणाऱ्यांनी मरीन लाईन्स व चर्चगेटमार्गे हुतात्मा चौकात उतरावे.
दक्षिण वा मध्य मुंबईतून येणाऱ्यांनी गिरगाव चौपाटी, महालक्ष्मी मंदिर, जसलोक हॉस्पिटलमार्गे ऑपेरा हाऊस व महर्षी कर्वे रोडने आयकर भवन किंवा चर्चगेट येथे उतरावे.
मोर्चादरम्यान कोणीही थेट व्यासपीठाकडे जाणार नाही, याची दक्षता घेण्यात आली असून स्वयंसेवकांच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“संविधान वाचवा, लोकशाही जगवा – चलो मुंबई!”
असा देण्यात आला असून, लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व मतदारांनी या मोर्चात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

