फलटण : फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात रोज नवे खुलासे होत असून तपासाची दिशा अधिक गंभीर होत चालली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
फलटण येथे एका महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे समोर आले. मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे लिहिली होती. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून दोघांनाही अटक केली आहे.
या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यांनी सर्वप्रथम पीएसआय बदणे याला निलंबित करण्याचे निर्देश दिले होते, तसेच आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेशही जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते.
आता, प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल तपास होण्यासाठी एसआयटी गठीत करण्यात येणार आहे. या विशेष पथकाच्या माध्यमातून सत्य समोर आणण्याचा प्रयत्न होईल, असे शासनस्तरावरून सांगण्यात येत आहे.

