मेढा (अजित जगताप) : पश्चिम महाराष्ट्र मध्ये तीस वर्षांपूर्वी शिवसेनेचा भगवा ध्वज फडकावून जावळीकरांनी क्रांती केली होती. आज या क्रांतीचे साक्षीदार पुन्हा एकदा नवक्रांतीसाठी जय्यत तयारी करत आहेत. त्याचाच भाग म्हणून मेढा तालुका जावळी या ठिकाणी शनिवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता कलश मंगल कार्यालय, मेढा या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेचे धनुष्य बाणाचा कलशरोहण होत आहे. याकडे जुन्या जाणत्या शिवसैनिक व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यात राजकीय घडामोडी घडवल्या गेल्या आहेत. इतिहासाचे साक्षीदार असलेल्या जावळीतील मावळ्यांनी आपापल्या परीने गड राखले आहेत. राजकीय पटलावर अनेक सत्ताधारी पक्षांमध्ये कोल्हाट्या उड्या मारणारे बहुतेक जण नवा राजा… नवा फायदा.. बघण्यासाठी आनंदाने नव नेतृत्वाकडे आकर्षित झालेले आहेत. त्याचा कितपत परिणाम राष्ट्रवादी नंतर भाजपचा नव्याने बांधलेल्या राजकीय किल्ल्याला होईल ? याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभुराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा मेढा येथे निर्धार मेळावा होत आहे. यामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक घेऊन त्यांच्या अदृश्य शक्तीचा उपयोग केला जाणार आहे.
जावळी तालुक्यातील मालचौंडी गावचे सुपुत्र असलेल्या शिवसेना नवी मुंबई संपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल युवा नेते अंकुश बाबा कदम यांचा नागरी सत्कार होणार आहे. त्यांच्या दमदार आगमनामुळे जावळीकरांना नव नेतृत्वाची सावली लाभलेली आहे. जावळीतील राजकीय पटलावरील पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात जाऊन आरक्षणासारखी जागा बळकवली आहे . काहींनी अनुकंपा योजनेसारखा काहींनी लाभ घेतला आहे. अशा परिस्थितीतही जावळीतील अनेक मान्यवरांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले आहे.
सध्या सत्ताधारी पक्षांमध्ये महायुती म्हणून सत्तेच्या लाभ वाटप करताना काही अतृप्त आत्मे नाराज झालेले आहेत.हे नाराज असलेल्या गट सध्या कदम.. कदम.. बढाये जा… हमको भी साया छोडके जा.. अशी छुप्या पद्धतीने हाक मारत आहेत. याची झलक मेढा येथील दहीहंडी महोत्सवात दिसून आली आहे. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. जिसमे है दम… वो है शिवसेना युवा नेते अंकुश सखाराम कदम… ही आता जावळीत लोकप्रिय टॅग लाईन झाली आहे.
जावळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरीच्या नगरपंचायत निवडणुकीत मध्ये सध्या १७ प्रभागांमध्ये किमान दहा प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व आहे. तसेच जावळी तालुक्यातील केळघर, करहर, कुडाळ, सायगाव, कुसुंबी व बामणोली भागात शिवसेनेच्या शिव धनुष्यबाणाच्या प्रेमात अनेक जण आहेत. त्यांची उपस्थिती सध्या चर्चेचा विषय ठरणार आहे. शिवसेना सह संपर्कप्रमुख आदरणीय एकनाथ ओंबळे यांनी मोठ्या प्रमाणात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यांची तळमळ व धडपड त्यांना निश्चितच भविष्यात न्याय देईल.
तूर्त जावळीकरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विशेष प्राधान्य दिले जात आहे. या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यासाठी जय्यत तयारी झाली आहे. जावळी तालुक्यातील शिवसेनेचे सुरेश मोरे, आनंदा रांजणे, विशाल शिंदे, नितीन मर्ढेकर, सुनिल शेलार, संदीप दळवी,नामदेव सपकाळ, वसंत धनावडे यांनी मेढा नगरपंचायत व कुसुंबी , कुडाळ व म्हसवे जिल्हा परिषद गटात व पंचायत समितीच्या गणात शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करेल . अशा पद्धतीने आखणी केली आहे. त्यामुळे निर्धार मेळाव्याला मिळणारे यश हे निष्ठावंत व प्रामाणिक शिवसैनिकांसाठी दिवाळी भेट ठरणार आहे.
__________________________________
फोटो– शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जावळीचे सुपुत्र अंकुश सखाराम कदम

