मुंबई (रवींद्र मालुसरे) : दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शनाचे सुवर्ण महोत्सवी (५० वे ) वर्ष  साजरे जाणारी आमची मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ही संस्था १९४९ पासून मुंबई-महाराष्ट्रात अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्थेच्या चळवळीचे ७६ वर्ष साजरे करीत आहे.
अमृततुल्य, संतांची, ज्ञानवंतांची, कीर्तिवंतांची, शूरांची, वीरांची, विजिगीषू अशी आपली मराठी मायभाषा ! १९०९ ला प्रकाशित झालेल्या मनोरंजन या पहिल्या दिवाळी अंकापासून आजपर्यंत अधिकाधिक समृद्ध झाली आहे. दरवर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने शेकडो दिवाळी अंक प्रकाशित होत आहेत. श्रीमंत आणि समृद्ध असलेला हा मराठी साहित्याचा ठेवा अधिकाधिक मराठी भाषिकांसमोर घेऊन जाण्याचे आणि जपण्याचे जोपासण्याचे काम संपादक, प्रकाशक, साहित्यिक, वितरक, वाचक ११७ वर्षे अविरतपणे परिश्रमपूर्वक आवडीने करीत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करताना संस्थेच्या वतीने गेल्या शतकभराचा आढावा घेत यावर्षी “दिवाळी अंक संस्कृती सूची ग्रंथ”  प्रकाशित करीत आहोत.
हा ग्रंथ परिपूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील अभ्यासकांना “आमच्या जिल्ह्यातील दिवाळी अंक परंपरा” या नावाने १२०० शब्दात संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा-जिल्ह्यातून लेख लिहून chalval1949@gmail.com, मेलवर किंवा या 9323117704 व्हॅट्सऍपवर दिनांक ३० नोव्हेंबर पर्यंत पाठवावा असे आवाहन करण्यात येत आहे. अभ्यासपूर्ण आणि सर्वसमावेशक असलेल्या लेखांचा समावेश या ग्रंथात केला जाईल असे आवाहन संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केले आहे.