मुंबई : चर्चेचे रूपांतर थरारात झाले, जेव्हा स्टुडिओत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान संशयित आर्य याने अचानक एअरगनने मुलांकडे निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या क्षणी पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आणि गोळीबार झाला.
या चकमकीत आर्य गंभीर जखमी झाला. त्याच्या छातीत गोळी लागल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पोलिसांनी स्टुडिओत अडकलेली सर्व १७ मुले, एक ज्येष्ठ नागरिक आणि आणखी एक पुरुष अशी एकूण १९ जणांची सुरक्षित सुटका केली आहे. सह पोलिस आयुक्त सत्यनारायणन यांनी सांगितले की, “सर्व मुले सुखरूप असून त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले, “ही अत्यंत आव्हानात्मक कारवाई होती. आम्ही आर्यशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा तो मुलांना इजा करण्याच्या हालचाली करू लागला, तेव्हा तत्काळ निर्णय घ्यावा लागला. मुलांचे जीव वाचवणे हीच आमची प्राथमिकता होती.
या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही अत्यंत गंभीर घटना आहे. तपास सुरु असून लवकरच सर्व तपशील जनतेसमोर मांडले जातील. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. मुलांची सुरक्षित सुटका आणि पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक सर्वत्र होत आहे.
