उब्रज(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील उंब्रज परिसरात स्वच्छ भारत अभियानाचे वास्तव चित्र समोर आले आहे. उंब्रज गावाजवळील तारळी नदीकाठी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, सदर ठिकाणीच कचरा जाळल्यामुळे परिसरात हवा व पर्यावरण प्रदूषणाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.
पावसाळ्यात हा कचरा थेट नदीत मिसळून पाणी प्रदूषण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे ही जागा राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी व प्रदूषित हवेला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “सातारा जिल्ह्यात तब्बल चार मंत्री असताना देखील अशा प्रकारचे दृश्य त्यांच्या नजरेस का पडत नाही?” स्वच्छ भारत अभियानासाठी लाखो-कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला असतानाही प्रत्यक्षात स्वच्छतेचा अभाव जाणवत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकारी व ग्रामपंचायतीवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
