मुंबई (शांताराम गुडेकर) : सांगली जिल्ह्यातील मालेवाडी या छोट्या खेड्यातून उभा राहिलेला तरुण दिग्दर्शक आणि संशोधक सोमनाथ वाघमारे याने आपल्या संवेदनशील दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर मराठी मातीचा गौरव वाढवला आहे. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आणि वाळवा तालुक्याची सून डॉ. गेल ऑम्बेट व त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर यांच्या जीवनावर आधारित ‘गेल – अ लाइट ऑफ ह्यूमॅनिटी’ या माहितीपटाचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे प्रदर्शन झाले. त्याला संशोधक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या माहितीपटाची निर्मिती वाघमारे यांनी तब्बल ८ वर्षांच्या परिश्रमानंतर पूर्ण केली आहे. पुढील काही दिवसांत या चित्रपटाचे ऑक्सफर्ड, केम्ब्रिज आणि ससेक्स विद्यापीठांतही प्रदर्शन होणार आहे. गेल ऑम्बेट या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होत्या. त्यांनी १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारून आयुष्य भारतातील सामाजिक परिवर्तन चळवळीला वाहून घेतले. महात्मा फुले, आंबेडकरवाद, ब्राह्मणेतर चळवळींचा अभ्यास आणि स्त्रीहक्क, दलित प्रश्न यावर त्यांनी केलेले संशोधन प्रसिद्ध आहे. कासेगाव येथील श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर हे त्यांचे सहकारी होते. या दोघांचे विचार, संघर्ष आणि प्रेमकथेचा वास्तवदर्शी पट या माहितीपटातून उलगडतो. ‘गेल – अ लाइट ऑफ ह्यूमॅनिटी’ या शीर्षकाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची सुरुवात कासेगावमधील त्यांच्या घरापासून होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, समाजातील भेदभावाच्या विरोधातील संघर्षाचा आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रवास यात चित्रित केला आहे.सोमनाथ बाबुराव वाघमारे यांचा नुकताच शिव समर्थ बहुउद्देशीय सेवा संस्था मालेवाडीच्या वतीने सत्कार प्रसंगी ग्रामपंचायत मालेवाडीचे माझी सरपंच रंगराव जाधव राजाराम बापू सह. बँक संचालक संभाजी पाटील, पत्रकार विलासराव कोळेकर, मिलिंद वाजे. धनाजी सूर्यवंशी,अविनाश कोकाटे, विशाल सूर्यवंशी, सुशांत जाधव,योगेश नलावडे, मंगेश कोळेकर,वैभव कोळेकर, प्रदिप बोकने आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.
मालेवाडीची किर्ती जगभर करणा-या तरुण दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांचा सत्कार
RELATED ARTICLES
