Monday, October 27, 2025
घरमहाराष्ट्रकुसुंबी गटात उमेदवारी सोपी,,, गडबडीने निवडणूक अवघड...

कुसुंबी गटात उमेदवारी सोपी,,, गडबडीने निवडणूक अवघड…

ेढा (अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषद व जावळी पंचायत समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरीत सध्या राजकीय शांतता आहे. मात्र ऐनवेळी उमेदवारी बदलली जाते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. श्री काळेश्वरी मंदिरामुळे धार्मिक स्थळ प्राप्त झालेल्या कुसुंबी जिल्हा परिषद गटामध्ये कुसुंबी व आंबेघर तर्फ मेढा हे दोन गण येत आहेत. या ठिकाणी उमेदवारी मिळणे सोपे आहे. परंतु, अंतर्गत गडबडीने निवडून येणे अवघड बनले आहे. कारण राजकारणात अनेक जण दुखावलेले आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ आणि युवा नेते अमित कदम, ज्ञानेश्वर रांजणे, वसंतराव मानकुमरे, एस. एस. पार्टे,बापूराव पार्टे यांच्या समवेत आता नव्याने शिवसेनावासी झालेले युवा नेते अंकुश कदम, एकनाथ ओंबळे यांच्या विचाराचे प्राबल्य या भागात आहे. एकमेका सहाय्य करू… अवघे धरू सुपंथ… असे जर राजकारण झाले तर त्याचा नेमका फायदा मतदारांना होणार आहे. अशावेळी राजकीय पटलावर जावळी तालुक्यात महाविकास आघाडीनेही या भागाकडे लक्ष केंद्रित केलेले आहे.
संपूर्ण सातारा जिल्ह्यात सत्तेच्या माध्यमातून संधी मिळावी. म्हणून अनेकांनी आपली पक्षनिष्ठा खुंटीला अडकून ठेवलेली आहे. याला जावळी तालुका अपवाद नाही. सत्तेच्या सोबत राहणे म्हणजेच राजकारण असे अनेकांनी आपली नवी ओळख निर्माण केलेली आहे. ज्यांनी निष्ठा जपलेली आहे. आजही त्यांचे आदराने नाव घेतली जात आहे.
कुसुंबी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपकडून पुन्हा एकदा अर्चना ज्ञानेश्वर रांजणे, महाविकास आघाडी कडून शितल अमित कदम, शिवसेनेकडून कविता एकनाथ ओंबळे, राष्ट्रवादीकडून अनुराधा अतिश कदम या नावांची चर्चा आहे. अद्यापही मुलाखती अथवा उमेदवारी बाबत घोषणाबाजी झालेली नाही. तरी मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत. सर्वच महिला उमेदवार प्रगल्भ व एकमेकांबद्दल आदरयुक्त भावना व्यक्त करत आहेत. ही चांगली गोष्ट आहे.
काहींचे पावसामुळे लावलेले बॅनर फाटून गेले आहेत. समाज माध्यमावर त्याची फारशी दखल घेतली जात नाही. अशा वेळी थेट मतदारांशी संपर्क साधण्याशिवाय इच्छुक उमेदवारांना पर्याय राहिलेला नाही. हे स्पष्ट झाले आहे.
जावळीत कुसुंबी जिल्हा परिषद गटात आंबेघर तर्फ मेढा गण इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे या ठिकाणी उमेदवार रवींद्र सल्लक, नारायण जाधव, राजेंद्र गाढवे, गणपत ढेबे ,संकेत पाटील यांच्या समवेतही कुणबी मराठा दाखला काढून नव्याने इतर मागासवर्गीय झालेले सागर धनवडे, सुनील जांभळे ,सचिन पार्टे यांनाही इतर मागासवर्गीय अधिकार प्राप्त झालेले आहेत. न्यायालयाने हे दाखले मान्य केले आहेत. कुसुंबी गणात लक्ष्मीताई प्रमोद कदम, प्रिया मारुती चिकणे, रूपाली शेलार, लक्ष्मी चिकणे, वैशाली साधू चिकणे, सुनिता विलास दुदळे, सुरेखा रवी शेलार, अर्चना पवार यांच्याही संभाव्य उमेदवार म्हणून नावाची चर्चा त्यांचे कट्टर समर्थक करत आहेत. राजकीय नेत्यांना आता या निवडणुकीकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करताना कोण किती गडबड करेल? हे सांगता येत नाही. निवडणूक म्हटलं की राजकीय कुरघोडी व आर्थिक गणित मांडताना नाराजी ओढवली जाते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढवणे. ही सर्वांचीच जबाबदारी आहे. याबाबत सर्वांनी जागरूकता दाखवणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments