
मुंबई (शांताराम गुडेकर) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील साखरपा शहरामधील मुर्शी गावचे सुपुत्र, मुलुंड येथे वास्तव्यास असलेले लेखक, कवी श्री.अशोक लोटणकर यांना नुकताच कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचा साहित्य गौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते मंचर पुणे येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.या वेळी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोटणकर यांच्या अक्षरनामा या काव्य संग्रहास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून या काव्य संग्रहाला मिळालेला हा सहावा पुरस्कार आहे. कविता, कथा, ललित, बाल साहित्य, ब्रेल लिपी इ. स्वरुपाची एकूण २१ पुस्तके त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या साहित्यकृतींना मानाचे ३० हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.त्यात कोकण साहित्य रत्न पुरस्कार, दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कार, एकता कल्चरल अकादमीचा नारायण सुर्वे पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार इ.चा समावेश आहे.लोटणकर हे सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले आहेत.ते बेस्ट मधून
आगार व्यवस्थापक या पदावरून सेवानिवृत्त झालेले असून ते अनेक सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांशी संबंधित आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा- मुर्शी गावचे सुपुत्र लोटणकर यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार, वृत्तपत्र लेखक,ग्रामीण मंडळ, विविध संस्था,प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
