कापूरहोळ (भीमराव धुळप) येथे पुणे सातारा



मार्गावर शिरवळ जवळ असलेल्या हॉटेल महाराजा येथे एसटी महामंडळाच्या बसेस जेवणासाठी थांबवल्या जातात. मात्र, या हॉटेलमध्ये प्रवाशांना दिले जाणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार समोर आली आहे.
प्रवाशांकडून अगोदरच कुपनद्वारे पैसे आकारले जातात आणि त्यानंतर त्यांना जेवण किंवा चहा–नाश्ता दिला जातो. प्रवाशांनी सांगितले की, मेनूमध्ये चिकन बिर्याणीची किंमत ₹२०० प्रति प्लेट अशी नमूद असूनही दिलेली बिर्याणी चायनीज राईस मिक्स स्वरूपात होती. या निकृष्ट जेवणाबाबत प्रवाशांनी हॉटेल मालकाकडे तक्रार केली असता त्यांनी ती दुर्लक्षित केली.
एसटी महामंडळाने जाहीर केल्यानुसार, महामंडळाच्या बसेस ज्या हॉटेलांवर थांबविल्या जातात, त्या ठिकाणी प्रवाशांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, कापूरहोळ येथील हॉटेल महाराजा येथे ही अट पाळली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रवाशांचा आरोप आहे की, अशा हॉटेलांमुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना आरोग्याचा धोका निर्माण होतो आणि प्रवासाचा त्रास अधिक वाढतो. अनेक प्रवाशांनी या संदर्भात एसटी महामंडळाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.
आता एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी या हॉटेलवर कारवाई करतील का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
