मुंबई : भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतुने दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ३१ ऑक्टोबर या जन्मदिनापासून ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा केला जातो. यावर्षी २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना ‘दक्षता आपली सामायिक जबाबदारी’ अशी ठेवण्यात आली असून राज्य शासनाच्या सर्व विभागांमध्ये या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सप्ताहाची सुरुवात २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाच्या प्रतिज्ञेने होणार असून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ही प्रतिज्ञा घेण्यात येईल. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दिलेले संदेश वाचून दाखवले जातील. तसेच हे संदेश राज्यातील जनतेपर्यंत विविध माध्यमांद्वारे पोहोचविण्यात येतील.
सप्ताहादरम्यान कार्यालयांच्या दर्शनी भागात तसेच सार्वजनिक ठिकाणी भ्रष्टाचाराविरोधी जनजागृतीचे बॅनर, पोस्टर आणि संदेश प्रदर्शित करण्यात येतील. मोठ्या शहरांमधील मोक्याच्या ठिकाणी जनजागृती संदेश प्रदर्शित करण्याबरोबरच निबंध, वक्तृत्व, चित्रकला यासारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाईल.
या बरोबरच भ्रष्टाचार निर्मूलनावर आधारित जनजागृती साहित्य व पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येईल. राज्य शासनाच्या सर्व विभागांमध्ये चर्चासत्रे, कार्यशाळा व विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
