कराड : येळगाव (ता.कराड) येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या शिवछत्रपती प्रतिष्ठान – एक सामाजिक जबाबदारी या उपक्रमांतर्गत आज “अदृश्य सेवक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या पहिल्या पुरस्काराचा मान नेताजी सुभाषचंद्र विद्यालय, येळगाव येथील चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री. अशोक बळवंत होगले यांना मिळाला.
हा सन्मान त्यांच्या गणेशवाडी (येळगाव) येथील निवासस्थानी जाऊन अत्यंत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप फेटा, शाल, श्रीफळ व रु. १५,०००/- (बँक ऑफ महाराष्ट्रचा धनादेश) असे होते.
श्री. होगले हे मागील ६ ते ७ वर्षांपासून विद्यालयात शिपाईपदी प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. पूर्वी पाच शिपायांची व्यवस्था असताना सध्या ते एकटेच शाळेचे सर्व काम समर्थपणे पार पाडत आहेत. अल्प वेतन असूनही त्यांच्या कामातील वक्तशीरपणा, निष्ठा आणि सेवाभाव अनुकरणीय आहे.
या उपक्रमाचे आयोजन करण्यामागे उद्दिष्ट होते — समाजातील अशा “अदृश्य सेवकांना” योग्य सन्मान मिळवून देणे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी व गणेशवाडी सरपंच बाळासाहेब माने, माजी प्राचार्य डी. टी. शेवाळे, माजी केंद्र शाळा प्रमुख वसंतराव पाटील, तसेच परसू आण्णा, सुशांत पाटील, दिलीप नायकवडी गुरुजी, झुंजार पाटील, मनोज पांगे, सचिव आकाराम शेटे आणि शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत पाटील, कर्नल डॉ. प्रदीप पाटील, अरुण गोडसे, राजेंद्र शेवाळे, ज्योतिराम चव्हाण (सॅन्डोज), राजेंद्र विभुते, संदीप पाटील, स्वरूप पाटील, महेश शेवाळे, सुजाता पाटील, राहुल पाटील, सूरज पाटील, राजू सुपनेकर, सुशांत व्ही. पाटील, राजेश सोरटे, विजय पवळे, विजय शेवाळे आदींनी बहुमूल्य सहकार्य केले.
शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या टीमने यापूर्वीही अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. संस्थेचे हे कार्य पुढेही अशाच जोमाने सुरू राहावे, अशी सर्व उपस्थितांची इच्छा व्यक्त करण्यात आली.
