मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या नात्यांमध्ये ऊब परतताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अनेकदा एकत्र दिसत आहेत. यंदाच्या दिवाळीतही दोघे भाऊ एकत्र सण साजरा करताना दिसले, तर भाऊबीजेचा आजचा सण या नात्यात आणखी गोडी आणणारा ठरला.
भाऊबीजच्या निमित्ताने दोन्ही बंधूंनी आपल्या बहीण जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या घरी सहकुटुंब उपस्थिती लावली. या प्रसंगी जयजयवंती यांनी दोन्ही भावांचे औक्षण करून भाऊबीजेचा विधी पार पाडला. हा क्षण ठाकरे कुटुंबासाठी भावनिक ठरला असून, तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच सणाच्या उत्सवात एकत्र दिसल्याने कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही वर्तुळांत चर्चांना उधाण आले आहे.
या कार्यक्रमाला राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे यांच्यासह उपस्थित होते, तर उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे, मुलगे आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्या सोबत आले होते.
गेल्या काही महिन्यांत ठाकरे कुटुंबातील स्नेहबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत. गणेशोत्सव, मधुवंती ठाकरे यांचा वाढदिवस, दीपोत्सव आणि आता भाऊबीज हे सर्व सण कुटुंबाने एकत्र साजरे केले आहेत. याच दरम्यान मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटनही प्रथमच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, हा महत्त्वाचा क्षण ठरला.
राजकीय वर्तुळात या वाढत्या भेटीगाठींना केवळ कौटुंबिक जवळीक म्हणून नव्हे, तर संभाव्य राजकीय समीकरणांच्या संकेतांप्रमाणेही पाहिले जात आहे. गेल्या चार महिन्यांत ठाकरे बंधूंची ही तब्बल दहावी भेट असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे युतीची घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.