मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहत असून, राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यास मंजुरी होती; परंतु आता विशेष बाब म्हणून ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत मदत व पुनर्वसन विभागाकडून खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ८१३९ कोटी रुपयांचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.
मंत्री श्री. जाधव पाटील यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ६ लाख १२ हजार १७७ शेतकऱ्यांना लाभ होणार असून, एकूण ६ लाख ५६ हजार ३१०.८३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीची भरपाई दिली जाणार आहे.
🔸 विभागनिहाय निधीचे वितरण पुढीलप्रमाणे:
छत्रपती संभाजीनगर विभाग (बीड, लातूर, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड): ₹३४६ कोटी ३१ लाख ७० हजार
नागपूर विभाग (नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली): ₹७ कोटी ५१ लाख ७५ हजार
नाशिक विभाग (नाशिक, जळगाव, अहिल्यानगर): ₹५९ कोटी ३६ लाख १३ हजार
अमरावती विभाग (अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम): ₹१३१ कोटी ५६ लाख ४७ हजार
पुणे विभाग (सोलापूर, सांगली): ₹१०३ कोटी ३७ लाख २० हजार
कोकण विभाग (ठाणे, पालघर): ₹२ लाख १६ हजार
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.